Sat, Jul 04, 2020 16:19होमपेज › National › छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

Last Updated: May 29 2020 4:38PM

छत्तीसगडचे पहिले आणि माजी मुख्यमंत्री अजित जोगीरायपूर (छत्तीसगड) : पुढारी ऑनलाईन

छत्तीसगडचे पहिले आणि माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ७४ वर्षाचे होते. रायपूर येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या ९ मे रोजी जोगी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी त्यांचे जन्मस्थान असलेल्या गौरेला येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अजित जोगी यांच्या निधनाबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने राज्यातील राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील जनतेच्या आठवणीत ते कायम राहतील, असे बघेल यांनी म्हटले आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी जोगी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर अजित जोगी राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. ते त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत जेसीसी- जे पक्षाशी जोडले होते. त्यांनीच या पक्षाची स्थापना केली होती. आयएएसची नोकरी सोडून जोगी यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी राज्य विधानसभा, लोकसभा, राज्यसभा आणि केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते नोव्हेंबर २००० ते नोव्हेंबर २००३ पर्यंत छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री होते.