Wed, Jun 19, 2019 09:02होमपेज › National › नाराज आलोक वर्मांचा सरकारी नोकरीला रामराम

नाराज आलोक वर्मांचा सरकारी नोकरीला रामराम

Published On: Jan 11 2019 4:05PM | Last Updated: Jan 11 2019 5:56PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सीबीआय संचालक पदावरून हटविण्यात आल्यानंतर आलोक वर्मा यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने वर्मा यांना गुरुवारी भ्रष्टाचार प्रकरणांवरून पदावरून हटविले होते. लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वर्मा यांनी सरकारी सेवेचा राजीनामा दिला आहे. सीबीआयमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, आलोक वर्मा यांना सीबीआय संचालक पदावरून हटविल्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णयही रद्द करण्यात आले आहेत. आलोक वर्मा यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर वर्मा ९ आणि १० जानेवारी रोजी सीबीआय कार्यालयात रुजू झाले होते. त्यांनी या दोन दिवसांत घेतलेले बदलीचे आदेश लगेच एक दिवसांनी सीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांनी रद्द केले आहेत. 

सीबीआयच्या संचालक पदावरून आलोक वर्मा यांना गुरुवारी हटवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या संचालकांनी परस्परांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सीबीआयची प्रतिमा मलिन झाली होती. त्यांच्यातील या संघर्षाची गंभीर दखल घेत, केंद्र सरकारने दोघांनाही सक्‍तीच्या रजेवर पाठविले होते.

वर्मा यांना पदावरून हटविण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्यावर झालेले भ्रष्ट्राचाराचे आरोप खोटे, निराधार असल्याचा दावा केला आहे.