Fri, Mar 22, 2019 04:13
    ब्रेकिंग    होमपेज › National › टीव्हीच्या रिमोटसाठी सासऱ्याने केला जावयाचा खून

टीव्हीच्या रिमोटसाठी सासऱ्याने केला जावयाचा खून

Published On: Apr 17 2018 5:12PM | Last Updated: Apr 17 2018 5:12PMनवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन

टीव्ही पाहण्यावरून सुरू झालेली भांडणे कोठेपर्यंत पोहचतील याचा काही नेम नाही. तेलंगाणामध्ये टीव्हीच्या रिमोटसाठी सासऱ्याने जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय जावयाचा सासऱ्याने कात्रीच्या जोडीने वार करून खून केला. कामारेड्डी जिल्ह्यातील बारामेघेडा या गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनी सासऱ्याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मंगाली व्यंकट याचा अक्षिता हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर तो सासऱ्याच्या घरात रहात होता. त्याचे सासरे भुजय्या यांचे केश कर्तनालयाचे दुकान आहे. त्यामध्ये मंगालीही त्यांच्यासोबत काम करत होता.

गेल्या बुधवारी मंगाली हा घरी दारू पिऊन आला होता. त्याला आयपीएलचा सामना पाहायचा होता मात्र, त्याचा सासरा अगोदरपासूनच मालिका पाहत बसला होता. त्यावेळी मॅच पाहण्यासाठी मंगालीने सासऱ्याकडे रिमोटची मागणी केली. मात्र, सासऱ्याने रिमोट देण्यास मनाई केली. मी मालिका पाहत आहे तुला दिसत नाही का? असे सासऱ्याने उत्तर दिले.

त्यानंतर रिमोटवरून या दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाले, हे भांडण वाढतच गेले. भांडण सोडवायला गेलेल्यांना हा आमचा घरगुती विषय आहे असे सांगून तेथून जाण्यास सांगितले. रागावलेल्या सासऱ्याने तेथे असलेल्या दोन कात्र्या घेतल्या आणि जावयावर वार केला. या घटनेनंतर मंगालीला ताबडतोब हैदराबाद येथील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे तो पाच दिवस कोमात होता, मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत सासऱ्यावर भादवि कलम 302 खाली गुन्हा दाखल केला आहे.

Tags : Father in-law, Kills, Son in-law, Television Remote