Sun, Oct 20, 2019 06:13होमपेज › National › निवडणूक आयोगाचा योगी आदित्यनाथ, मायावतींना दणका; प्रचारावर बंदी

निवडणूक आयोगाचा योगी आदित्यनाथ, मायावतींना दणका; प्रचारावर बंदी

Published On: Apr 15 2019 3:02PM | Last Updated: Apr 15 2019 3:09PM
लखनऊ : पुढारी ऑनलाईन

अत्यंत भडक वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने जबर दणका दिला आहे. योगींना आयोगाकडून  ७२ तास प्रचार करण्यासाठी बंदी घालण्यात आली. दुसरीकडे मायावती यांनाही ४८ तास कोणताही  प्रचार करण्यासाठी  बंदी घालण्यात आली आहे. उद्या (ता.१६) सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या बंदीची वेळ सुरू होईल.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही नेत्यांना आयोगाकडून दणका देण्यात आला. योगी यांनी भारतीय लष्कराला 'मोदी सेना' म्हणण्यापर्यंत मजल मारली होती. मायावती यांनी थेट मुस्लिम समाजाकडे महाआघाडीलाच मतदान करण्याची मागणी सभेतून केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या गंभीर वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेत त्यांना दणका दिला. 

लोकसभेसाठी सात टप्प्यात मतदान होत असून पहिला टप्पा पार पडला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सातही टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाचे दोन दिवस उरले असताना दोन्ही नेत्यांना निवडणूक दणका दिल्याने राजकीय क्षेत्रात  खळबळ उडाली आहे.