Mon, Jul 22, 2019 13:51होमपेज › National › आता लायसन्‍स बाळगण्याची गरज नाही!

आता लायसन्‍स बाळगण्याची गरज नाही!

Published On: Aug 10 2018 9:41AM | Last Updated: Aug 10 2018 9:26AMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

वाहतूक नियमांचे उल्‍लंघन झाल्यानंतर पोलिसांनी वाहतूक परवाना (ड्रायव्‍हिंग लायसन्‍स) काढून घेतल्याचा प्रकार अनेकांनी अनुभवला असेल. पोलिसांनी आपल्याला पकडल्यानंतर वाहतूक परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विम्याबाबत कागदपत्रांची मागणी केली असेल. अशा प्रकरणांत नाईलाजाने चिरीमिरी देऊन किंवा दंड भरून आपली सुटका करवून घेतल्याचा अनुभवही काहींना असेल. परंतु आपल्यासाठी एक खूशखबर आहे. आता वाहतूक पोलिसांना तुमचा कोणताही परवाना जप्‍त करता येणार नाही. तसे निर्देश नव्या नियमावलीत परिवहन मंत्रालयानेच दिले आहेत. 

परिवहन मंत्रालयाने नव्या आयटी कायद्याच्या आधारे याबाबत निर्देश जारी केले आहेत. वाहतूक पोलिस आणि राज्य परिवहन विभागाला कोणतीही मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी घेऊ नयेत असे निर्देश नव्या नियमावलीत दिले आहेत. त्यासाठी डिजिलॉकर किंवा एम परिवहनसारख्या ॲपवर उपलब्ध कागदपत्रांच्या प्रती ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अर्थातच वाहतूक पोलिस आता स्‍वत:च्या मोबाईलवरूनच ही माहिती घेतील. त्यासाठी ओरिजनल कागदपत्रे मागणार नाहीत.

आयटी ॲक्‍ट २००० नुसार डिजिलॉकर किंवा एम परिवहन यांवर उपलब्‍ध कागदपत्रांचे रेकॉर्ड ग्राह्य धरता येईल, असे मंत्रालयाचे म्‍हणणे आहे. मोटर व्‍हेईकल ॲक्‍ट १९८८ मध्येही इलेक्‍ट्रॉनिक स्‍वरुपात उपलब्ध कागदपत्रांना मान्यदा देण्यात आली आहे. सध्या सर्व मोबाईलमध्ये डिजिलॉकर उपलब्ध आहे. परंतु एम परिवहन हे ॲप केवळ ॲन्‍ड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध आहे.  काही दिवसात हे ॲपलच्या आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. 

सामान्यांची फसगत आणि भ्रष्‍टाचाराला आळा

बर्‍याचदा गाडी घेऊन बाहेर पडल्यानंतर काही कागदपत्रांच्या मूळ प्रती जवळ नसल्यास समस्या निर्माण होत. अनावधानाने वाहतूक नियमांचे उल्‍लंघन झाल्यास पोलिसांकडून सर्व मूळ कागदपत्रांची मागणी केली जाते. यावेळी एखादे कागदपत्र किंवा परवाना नसल्यास नाहक दंड भरावा लागतो. यातून चिरीमिरी देऊन सुटका करवून घेण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे अशा प्रकारांना काही प्रमाणात नव्या नियमावलीमुळे आळा बसणार आहे.