Sun, Jun 07, 2020 02:12होमपेज › National › भाजपच्या पैशाची गरज नाही, आमच्या ताकदीवर विद्यासागरांचा पुतळा उभारू-ममता

भाजपच्या पैशाची गरज नाही, आमच्या ताकदीवर विद्यासागरांचा पुतळा उभारू-ममता

Published On: May 16 2019 2:46PM | Last Updated: May 16 2019 2:46PM
कोलकाता  : पुढारी ऑनलाईन

पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचाराचे पडसाद दिल्‍लीपर्यंत उमटले. यावरून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. अमित शहांच्या रोड शो दरम्यान तोडफोड झालेला समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा पुन्हा उभारण्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला सुनावले आहे. बंगालला भाजपच्या पैशाची गरज नाही. आम्ही आमच्या ताकदीवर विद्यासागर यांचा पुतळा उभारू, असे ममतांनी आज म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील प्रचार सभेत, विद्यासागर यांचा पुतळा ज्या ठिकाणी उभा होता; त्याच ठिकाणी त्यांचा पुतळा पुन्हा उभारू, असे आश्वासन दिले. त्यावर ममता बॅनर्जी यांनी येथील प्रचार सभेत बोलताना मोदींवर निशाणा साधला. मोदींनी कोलकाता येथे विद्यासागर यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले आहे. पण आम्ही भाजपकडून का पैसे घेऊ. आम्ही आमच्या ताकदीवर पुतळा उभारू, असे ममता यांनी म्हटले.

भाजपने पश्चिम बंगालमधील २०० वर्षे जुना वारसा उद्ध्वस्त केला. जे अशा पक्षाला पाठिंबा देत आहेत; त्यांना समाज स्वीकारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काल मोठी कारवाई केली. पश्चिम बंगालमधील ९ लोकसभा मतदारसंघात आज रात्री १० वाजल्यापासून प्रचारावर बंदी घातली आहे. भारतातील निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच मुदतीपूर्वीच २० तास आधी प्रचार थांबविण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला.

कोलकाता येथे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीची घटना दुर्देवी असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते.