Thu, May 23, 2019 10:10
    ब्रेकिंग    होमपेज › National › 'तितली'चा तडाखा; आंध्रमध्ये ८ जणांचा मृत्यू

'तितली'चा तडाखा; आंध्रमध्ये ८ जणांचा मृत्यू

Published On: Oct 11 2018 8:38AM | Last Updated: Oct 11 2018 3:28PMभुवनेश्वर: पुढारी ऑनलाईन

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तितली हे चक्रीवादळ आज सकाळी ओडिशातील गोपालपूर जवळ धडकले. भयानक रुप धारण केलेल्या या वादळाने आंध्र प्रदेशमधील उत्तर भागालाही तडाखा दिला. यामुळे विजयनगर जिल्ह्यातील श्रीकाकुलम येथील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

चक्रीवादळामुळे मोठी पडझड झाली असून वीज आणि दूरसंचार सेवा ठप्प झाली आहे. रस्त्यांचे नुकसान झाल्यामुळे किनारपट्टीतील गावांचा संपर्क तुटला आहे. या वादळामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी सकाळी ओडिशातील गोपालपूरमध्ये या वादळाचे भयानक स्वरुप पाहायला मिळाले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात अनेक झाडे कोसळली आहेत आणि विजेचे खांब पडले आहेत. तितली वादळाचा धोका असल्याने बुधवारीच ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यात खबरदारीच्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या. 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ सकाळी ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकल्यानंतर आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे सरकले आहे. यामुळे ताशी १६५ किलोमीटर वेगाने वारे वहात येत आहे. 

वादळाच्या पार्श्वभूमीवर १८ जिल्ह्यांत रेड अलर्ट दिला आहे. सरकारने बुधवारीच किनारपट्टी भागातील जवळ जवळ 3 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. 

शाळा आणि कॉलेजना सुट्टी
ओडिशा सरकारने राज्यातील सर्व शाळा, कॉलेज आणि अंगणवाडी केंद्रांना ११ आणि १२ ऑक्टोबरला सुट्टी दिली आहे. वादळाचा परिणाम संपूर्ण राज्यात होण्याची शक्यता असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सुट्टी दिल्याचे मुख्य सचिव आदित्य प्रसाद पाधी यांनी सांगितले. तसेच राज्यात होणाऱ्या रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे.  

Live अपडेट
आंध्र प्रदेशातील विजयनगर जिल्ह्यातील वीज, दूरसंचार सेवा ठप्प
किनारपट्टीतील गावांचा संपर्क तुटला
आंध्र प्रदेशमध्ये ८ जणां मृत्यू 
3 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले
ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस