Sun, May 31, 2020 13:13होमपेज › National › वाराणसीत प्रियांका गांधींचे जोरदार शक्तीप्रदर्शन; 'रोड शो'ला मोठी गर्दी

वाराणसीत प्रियांका गांधींचे जोरदार शक्तीप्रदर्शन; 'रोड शो'ला मोठी गर्दी

Published On: May 15 2019 7:32PM | Last Updated: May 15 2019 7:32PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असलेल्या वाराणसी मतदारसंघात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांनी शक्ती प्रदर्शन केले. याआधी येथे पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीत भव्य रोड शो केला होता. त्यानंतर तब्बल तीन आठवड्यांनी आज सायंकाळी प्रियांका गांधींनी येथे रोड शो केला. त्यांच्या सोबत रोड शो मध्ये काँग्रेसचे वाराणसीमधील उमेदवार अजय राय आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले होते.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रांगणातील पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्यापासून प्रियांका गांधी यांनी रोड शोला सुरुवात केली. त्यांच्या रोड शोला मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. ज्या मार्गावर रोड शो होता त्या मार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या. मोदींप्रमाणेच प्रियांका गांधी रोड शोनंतर  दशाश्वमेध घाटावर गंगा आरती करतील. त्यानंतर त्या काशी विश्वनाथ मंदिरात आणि त्यानंतर कालभैरव मंदिरात प्रार्थना करणार आहेत.  

लोकसभा मतदानाचे सहा टप्पे पार पडले असून अखेरचा सातवा टप्पा १९ मे ला पार पडणार आहे. अखेरच्या टप्प्यात प्रमुख पक्ष आपल्या उमेदवारांसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. सातव्या टप्प्यातील वाराणसी हा मतदारसंघ हायप्रोफाईल मानला जातो. या मतदासंघातून निवडणुकीच्या रिंगणात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरले आहेत. तर काँग्रेसकडून अजय राय निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मोदींना टक्कर देण्यासाठी आणि राय यांच्या समर्थनार्थ काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांनी आज वाराणसीत रोड शो केला.