Sun, Aug 18, 2019 06:56होमपेज › National › राफेलवरून रणकंदन

राफेलवरून रणकंदन

Published On: Feb 13 2019 2:05AM | Last Updated: Feb 13 2019 2:02AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा/पीटीआय

राफेल लढाऊ विमान सौद्यावरून सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये संसदेसह संसदेबाहेर रणकंदन उसळले. राफेलप्रकरणी महालेखापरीक्षकांचा अहवाल (कॅग) मीडियात लिक झाल्याच्या मुद्द्यावरून आणि लोकसभेऐवजी राज्यसभेत ‘कॅग’चा अहवाल सादर केल्यावरून काँग्रेसने सभागृहात गोंधळ घातला. राफेल प्रकरणाची संयुक्‍त संसदीय समितीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँगे्रसने लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्टखाली देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मोदींना अटक करण्याची मागणी केली. भाजपने पलटवार केला. राहुल गांधी हे विदेशी कंपन्यांचे दलाल असल्याचा आरोप केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.  

मोदींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानी यांचे दलाल असल्याचे उघड झाले आहे. गोपनीयता कायद्याचा (ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट) मोदी यांनी भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. 

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका एअरबस कंपनीच्या अधिकार्‍याने लिहिलेल्या ई-मेलची प्रत सादर केली. रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी हे फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना भेटल्याचा उल्‍लेख या ई-मेलमध्ये असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या भेटीनंतर राफेल करारानुसार कंत्राट आपल्याला मिळेल, असे अंबानी यांनी हा करार होण्याच्या 10 दिवस अगोदरच म्हटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

राफेल खरेदी करार होण्याच्या 10 दिवस आधीच हे कंत्राट आपल्यालाच मिळेल हे अनिल अंबानींना कसे समजले तसेच या कराराआधीच  अंबानी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना कसे भेटले, याबाबत पंतप्रधान मोदी यांनी जनतेला उत्तर द्यावे, असे आवाहनही राहुल यांनी केले. सर्वात मोठ्या संरक्षण कराराबाबत जी गोष्ट अनिल अंबानींना कळते, ती गोष्ट देशाच्या संरक्षणमंत्र्यांना मात्र अजिबात माहीत नसते, याबाबत राहुल यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. ‘कॅग’चा अहवाल अर्थहीन असून ‘कॅग’ म्हणजे चौकीदार ऑडिटर जनरल असे संबोधत राहुल यांनी ‘कॅग’ची खिल्‍ली उडवली.

राहुल विदेशी कंपन्यांचे दलाल : रविशंकर प्रसाद

राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे विदेशी विमान कंपन्यांसाठी लॉबिंग करीत असल्याचा आरोप केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी मध्यस्थाचे काम करीत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्यात त्यांनी एका ई-मेलचाही हवाला दिला. त्यास केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले.

प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप म्हणजे खोटेपणाची पराकाष्ठा आहे. ज्या कंपनीच्या ई-मेलचा हवाला राहुल गांधी देत आहेत, ती कंपनीच संशयाच्या भोवर्‍यात सापडलेली आहे. संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) कार्यकाळातील एका कंत्राटाविषयी एअरबसच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एअरबस कंपनीच्या ई-मेलची माहिती राहुल गांधी यांना कशी मिळाली?, राहुल गांधी हे काही विमान कंपन्यांसाठी लॉबिंग करीत आहेत, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला. राहुल गांधी यांचा खोटेपणा सातत्याने उघडकीस आणला जात असल्याचे सांगत रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधानांविषयी सातत्याने ज्या प्रकारची भाषा आणि आरोप करीत आहेत, त्याचे प्रत्युत्तर जनताच देईल.