Fri, Mar 22, 2019 03:11
    ब्रेकिंग    होमपेज › National › धक्कादायक; बापच निघाला होता नवजात मुलीला विकायला

धक्कादायक; बापाने मुलीला कॅरिबॅगमध्ये घालून नेले विकण्यासाठी

Published On: May 16 2018 1:26PM | Last Updated: May 16 2018 1:28PMमोहाली : पुढारी ऑनलाईन 

मुलगाच वंशाचा दिवा आहे, असे मानणार्‍या समाजात मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण महाराष्ट्र राज्यात वाढले असल्याचे वृत्त ऐकायला मिळाले असले तरी पंजाबसारख्या राज्यात अजुनही मुलीगी ही नकुशी वाटत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबवले जात असतानाच तिसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून बाप तिला विकायला रुग्णालयात घेवून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मोहाली येथील सरकारी रुग्णालयात ही घटना उघडकीस आली. काल रात्री दहाच्या सुमारास एक व्यक्ती रुग्णालयातील डॉक्टरला म्हणाला की,माझ्या नवजात बाळाला विकायचे आहे. हे ऐकताच डॉक्टरांना आश्चर्य वाटले. मात्र, त्यानंतर जेव्हा बाळ कुठे आहे असे विचारले असता जे घडले ते पाहून तर डॉक्टर सुन्न झाले. त्या पाषाणह्रदयी बापाने नवजात मुलीला प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून आणले होते. डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मुलीला सुखरुप वाचवण्यात आले.

या प्रकारानंतर डॉक्टरांनी नवजात मुलीला आपल्याकडे घेतले. वैद्यकिय तपासणी केली असता तब्येत बिघडली असल्याचे समजले. त्यानंतर डॉक्टरांनी बाळावर उपचार सुरु केले आणि स्थानिक पोलिसांकडे बापा विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवजात मुलीला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बापाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर मिळालेली माहिती अशी की, मोहाली जिल्ह्यातील बल्लोमाजरा गावात जसपाल सिंह हा भाड्याने खोली घेऊन राहतो. त्याला दोन मुलगे आहेत आणि तिसऱ्यावेळी मुलगी झाल्याने त्या नवजात मुलीला विकण्यासाठी प्लास्टिकच्या बॅगमध्ये घालून तो रुग्णालयात पोहचला होता. 

मोहाली येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, जसपाल मुलीला घेऊन  आला तेव्हा तिची प्रकृती नाजूक बनली होती. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. आता मुलीची प्रकृती स्थिर आहे.

यापूर्वीदेखील जसपालने दुसऱ्या नवजात मुलीला विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. आता मोहाली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Tags : Sell, New Born Baby, Girl, Father, Mohali