नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. बिहार आणि आसाममध्ये महापुराशी संबंधित मृतांचा आकडा १७४ वर पोहोचला आहे. तर सुमारे १ कोटी ९ लाख लोक प्रभावित झाले आहेत.
बिहारमधील दरभंगा येथील पूरस्थिती अधिक गंभीर आहे. येथे पुरात अडकलेल्या लोकांकडे अन्न शिल्लक राहिलेले नाही. त्यासाठी भारतीय हवाई दल पूरग्रस्तांना दोन हेलिकॉप्टरद्वारे अन्न पदार्थाची पाकिटे पुरवित आहे.
बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, आसाम, तामिळनाडू यासह अनेक राज्यांत येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आसाममधील धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, सोनीतपूर, दारंग, बक्सा, बारपेट, नालबारी, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, गोलपाडा, मोरीगाव, होजई, गोलाघाट, मजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ आणि तीनसुकिया या जिल्हातही मुसळधार पाऊसाने थैमान घातले आहे. काझीरंगा अभयारण्यातील बहुतांश भागात पाणी शिरले आहे.