Wed, Jul 08, 2020 20:31होमपेज › National › भाजपकडून वायएसआर काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर?

भाजपकडून वायएसआर काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर?

Published On: Jun 12 2019 1:13PM | Last Updated: Jun 12 2019 1:12PM
विजयवाडा : पुढारी ऑनलाईन

भाजपने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने याआधी लोकसभा सभापतीपदाची मागणी केली होती. 

वायएसआर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत २२ जागा जिंकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव यांना काल, मंगळवारी जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा करून लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर दिल्याचे समजते.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने दिलेल्या ऑफरवर अद्याप वायएसआर काँग्रेसने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर विचार करण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. जगनमोहन यांच्या पक्षाला आंध्र प्रदेशातील अल्पसंख्यांक मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. ही व्होट बँक लक्षात घेऊन ही ऑफर स्वीकारण्यापूर्वी जगन मोहन आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

काल, मंगळवारी जगन मोहन रेड्डी आणि जीवीएल नरसिम्हा राव यांच्या अर्धा तास चर्चा झाली. ही शिष्टाचार भेट असल्याचे सांगितले जात असले तरी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून जगनमोहन रेड्डी यांना ऑफर दिली आहे.

गेल्या लोकसभा कार्यकाळात लोकसभा उपसभापतीपद एआयएडीएमकेचे के. एम. थंबीदुरई यांना दिले होते. आता हे पद वायएसआर काँग्रेसला दिले जाणार आहे. निती आयोगाची दिल्लीत १५ जून रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत जगन मोहन रेड्डी सहभागी होणार आहे. याच दरम्यान ते पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचे समजते.