Mon, Dec 10, 2018 03:58होमपेज › National › रेल्वे अपघातांपासून हत्तींना वाचवणार ‘मधमाशा’!

रेल्वे अपघातांपासून हत्तींना वाचवणार ‘मधमाशा’!

Published On: Feb 13 2018 6:39PM | Last Updated: Feb 13 2018 6:38PMकोलकाता : वृत्तसंस्था

रेल्वेच्या धडकेने जंगली प्राणी विशेषत: हत्तींना आपले प्राण गमवावे लागत असल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालमध्ये रेल्वेरुळांपासून हत्तींना दूर ठेवण्यासाठी रेल्वेप्रशासनाने एक नामी शक्कल लढवली आहे. याठिकाणी हत्तींना पटरीपासून दूर ठेवण्यासाठी रुळाला मधमाशांच्या घोंगावण्याचा आवाज काढणारे उपकरण लावण्यात येणार आहे.

देशातील उत्तर-पूर्व भागात रेल्वेच्या धडकेने हत्ती मारले गेल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. अशा दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वेतर्फे ही युक्ती करण्यात येत आहे. आसामच्या रांगिया भागात हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर रेल्वेतर्फे पश्‍चिम बंगालच्या अलीपूरद्वार येथे हा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दिली. 

मधमाशांच्या घोंगावण्याच्या आवाजापासून हत्ती दूर राहतात, असा स्थानिक लोकांचाही दावा आहे. मधमाशांचा घोंगावण्याचा आवाज इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन घेवून तो एम्प्लिफायरवर वाजवला जातो. या आवाजाला घाबरुन हत्ती किमान 600 मीटर दूर राहतात. ही उपकरणे क्रॉसिंगचे ठिकाण तसेच रेल्वेरुळाला लागून असलेल्या महत्वाच्या ठिकाणी लावण्यात येत आहेत. उत्तर-पूर्व सीमावर्ती रेल्वेच्या अखत्यारीत हत्तींचे 27 भाग येतात. हे भाग उत्तर बंगाल, पूर्व बिहार व उत्तर-पूर्व भागाशी संलग्न आहेत. 

अलीपूरद्वार विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणव ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 च्या मध्यात रांगिया विभागाच्या गोलपाडा येथे प्रायोगिक तत्वावर हे उपकरण लावले असता रेल्वेने हत्तींना धडक दिल्याची  एकही घटना घडलेली नाही. गेल्या आठवड्यात आसामच्या लमदिंग सुरक्षित वनक्षेत्राजवळ हवाईपूर येथे एका रेल्वेने धडक दिल्याने 5 हत्ती मारले गेले होते.