होमपेज › National › कर्नाटकात काँग्रेसचा तात्पुरता तोडगा; सतीश ‘इन’, रमेश ‘आऊट’?

कर्नाटकात काँग्रेसचा तात्पुरता तोडगा; सतीश ‘इन’, रमेश ‘आऊट’?

Published On: Sep 15 2018 1:50AM | Last Updated: Sep 15 2018 1:50AMबंगळूर : प्रतिनिधी

जारकीहोळी बंधूंची नाराजी दूर करण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेसने उपाययोजना आखली आहे. सतीश जारकीहोळी यांना मंत्रिपद देऊन वादावर पडदा पाडला जाणार आहे. मात्र, रमेश जारकीहोळींचे मंत्रिपद काढून घेतले जाणार आहे. फक्त ते काढून कसे घ्यायचे, यावर विचार सुरू आहे.

बेळगावच्या पीएलडी बँकेच्या राजकारणावरून जारकीहोळी बंधू आणि आ. लक्ष्मी हेब्बाळकर या काँग्रेसी नेत्यांमध्येच संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यावरून राज्यातील युती सरकारही गडगडण्याची चिन्हे आहेत. या संघर्षावर तोडगा म्हणून काँग्रेसने सतीश यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचा विचार चालवला आहे. सतीश हे सर्व नेत्यांशी सुसंवाद साधतात. सर्वांमध्ये ते मिसळतात. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार केला जात आहे. पण, नुकतीच बंडखोरी केलेल्या रमेश जारकीहोळी यांचे मंत्रिपद काढून घेण्याबाबतही विचार केला जात आहे. पण, त्यांना हटवायचे कसे, अशी  प्रदेश काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे.

भाजपविरुद्ध तक्रार

भाजपकडून काँग्रेस-निजद युती सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामुळे भाजप आणि त्या पक्षातील नेत्यांविरूद्ध प्राप्तीकर खात्याकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी दिली.

शुक्रवारी ते  त्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यघटनेविरोधी कारभार केला जात आहे. युती सरकार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. भाजप आमदार अश्‍वत्थ नारायण, एस. आर. पाटील, सतीश रेड्डी, माजी आमदार सी. पी. योगीश्‍वर यांनी काँग्रेस आमदारांच्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी जाऊन आमिषे दाखविली आहेत. 50 ते 100 कोटींचे आमिष दाखविले जात आहे. बंगळुरातील एका उद्योजकाचा पाठिंबा भाजपला आहे. काँग्रेस आमदार सी. एस. शिवळ्ळी, अनिल चिक्कमादू, बी. सी. पाटील यांना आमिषे दाखविण्यात आली. त्यामुळए आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडेही (एसीबी) तक्रार करण्याबाबत विचार सुरू आहे.

पुन्हा ऑपरेशन कमळ

जारकीहोळी आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. काँग्रेसमधील काही आमदारांना गळ टाकून कोट्यवधींचे आमिष दाखविण्यात आले. ऑपरेशन कमळ राबवून काही आमदारांना भाजपप्रवेश देण्याचा डाव आखण्यात आला होता. पण, याकरिता कोट्यवधींची रक्कम आली कोठून? असा प्रश्‍न गुंडुराव यांनी केला. या विरोधात  कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ईश्‍वर खंड्रे यांनी प्राप्तीकर खात्याकडे तक्रार केली असून चौकशीची मागणी केली आहे.