Fri, Mar 22, 2019 03:10
    ब्रेकिंग    होमपेज › National › कर्नाटकात सत्तेचा पेच; भाजपसमोर तीन मार्ग

कर्नाटकात भाजप तीनपैकी कोणता डाव खेळणार?

Published On: May 16 2018 4:01PM | Last Updated: May 16 2018 4:21PMबंगळुरू : पुढारी ऑनलाईन

कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागला खरा मात्र कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने सरकार कोणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कालपासून कर्नाटकच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११२ चे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. अशा परिस्थितीत  कर्नाटकात सरकार स्थापन करायचे असेल तर भाजपसमोर तीन मार्ग उपलब्ध आहेत.

विरोधकांतील आमदार फोडणे
भाजपला बहुमतासाठी ७ आमदारांची गरज आहे. काँग्रेसकडे ७८ तर जेडीएसकडे ३७ संख्याबळ आहे. तर इतर ३ जण आहेत. यात काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याने दोन्ही पक्षांचे संख्याबळ ११५ इतके होत आहे. त्यामुळे जेडीएस-कॉग्रेसचे सरकार राज्यात स्थापन होऊ शकते. मात्र, भाजप पुन्हा २००८ मधील राजकारणाची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे. २००८च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३ आमदार कमी पडत होते. तेव्हा त्यांनी जेडीएसचे ४ आणि काँग्रेसच्या ३ आमदारांना आपल्याकडे वळवून राजीनामा देण्यासाठी तयार केले होते. त्यामुळे विधानसभेतील आमदारांची संख्या कमी झाल्यानंतर भाजपने बहुमत सिद्ध करत सरकार स्थापन केले होते.

सध्या देखील अशीच परिस्थिती असल्याने भाजप जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांना वळवून सरकार स्थापन करु शकते. मात्र यासाठी भाजपला एकूण आमदारांची संख्या २०७ पर्यंत कमी करावी लागेल. जेडीएस आणि काँग्रेसमधील १५ आमदारांनी विश्वास ठरावापूर्वी राजीना दिल्यास भाजपला बहुमत सिद्ध करणे शक्य आहे.

माजी पंतप्रधान वाजपेयींप्रमाणे राजीनामा देणे

१९९६ मध्ये केंद्रात भाजपकडे बहुमत नव्हते. तेव्हा पक्षाला सर्वाधिक जागा होत्या. त्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा करत सरकार बनवले होते.  अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांना विश्वास ठरावाचा सामना करावा लागला होता. तेव्हा त्यांनी एक भावनिक भाषण केले ज्याचे प्रसारण दूरदर्शनवरुन झाले होते. यावेळी झालेल्या वादविवादानंतर वाजपेयी यांनी राजीनामा देणे योग्य समजले होते. अवघ्या १३ दिवसांत त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांचे हे पाऊल उत्तर आणि पूर्व भारतात भाजपसाठी फायद्याचे ठरले होते. अशाच पद्धतीने येडियुरप्पा बहुमताशिवाय सरकार स्थापन करु शकतात. त्यांनतर विश्वास ठरावापूर्वी राजीनामा देवून कर्नाटकात आपली वोटबँक मजबूत बनवण्यासाठी रणनिती आखता येईल.

विरोधी बाकावर बसणे

काँग्रेस-जेडीएसला सत्ता स्थापन करण्याची संधी देवून विरोध बाकावर बसण्याचा पर्याय भाजप निवडू शकते. आपल्याला बहुमत नाही हे मान्य करुन सरकार स्थापन करण्याच्या स्पर्धेतून माघार  घेण्याचा पर्याय भाजपसमोर आहे.

मात्र, भाजपने याअगोदर मणिपूर, गोव्यात बहुमत नसताना इतर पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे कर्नाटकातही भाजप कॉग्रेस-जेडीएसमधील आमदारांना राजीनामा देण्यास तयार करुन सत्तेसाठी प्रयत्न करु शकते. तसेच कर्नाटकात लोकसभेसाठी २८ जागा आहेत. त्या २०१९ च्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने भाजप सत्ता सोडण्यासाठी सहजासहजी तयार होणार नाही. 

कर्नाटकातील २२४ पैकी २२२ जागांसाठी निवडणूक झाली. यात भाजपने सर्वाधिक १०४ जागा जिंकल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी भाजपला अजून ७ आमदारांची आवश्यकता आहे. भाजपने विधीमंडळ नेता म्हणून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांची निवड केली आहे. आता प्रतिस्पर्धी पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवणे, सरकार स्थापन करण्याचा दावा करुन नंतर राजीनामा देणे किंवा विरोधी बाकावर बसण्यात समाधान मानण्याचा पर्याय येडियुरप्पा यांच्यासमोर आहे.

वाचा:

भाजप नेते, जावडेकर भेटलेच नाहीत; आम्ही काँग्रेससोबतच : कुमारस्वामी

‘केरळ टुरिझमचे कर्नाटकच्या आमदारांना आमंत्रण’

Tags : Karnataka, Election, 2018, Result, BJP, Congress,