Sun, May 31, 2020 15:03होमपेज › National › कोरोनाविरोधात लढण्यासाठी केजरीवालांची फाईव्ह टी योजना

कोरोनाविरोधात लढण्यासाठी केजरीवालांची फाईव्ह टी योजना

Last Updated: Apr 07 2020 11:10PM
नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  ‘फाईव्ह टी’ योजना सुरू केली आहे. यात टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीमवर्क आणि ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग याचा समावेश असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. 

व्हिडीओ संदेशात केजरीवाल म्हणाले, की दिल्लीत 30 हजार रुग्ण झाले, तरी आता सरकार तयार आहे. सध्या दिल्लीत 500 रुग्ण आहेत. डॉक्टर, नर्स हे कोरोनाविरुद्धच्या लढाईतील महत्त्वाचे शिपाई आहेत. शेजार्‍यांनी त्यांच्याशी चांगले वर्तन ठेवावे. आपल्याला तीन पावले पुढे राहावे लागेल. 

टेस्टिंगमध्ये दक्षिण कोरियाचे उदाहरण समोर ठेवून मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केले जाईल. 1 लाख रॅपिड टेस्ट केल्या जातील. हॉटस्पॉट असलेल्या मर्कज, दिलशाद गार्डन येथे सर्वाधिक रॅपिड टेस्ट होतील. ट्रेसिंगमध्ये 14 दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह कुणाकुणाला भेटला, ते ट्रेस केले जाईल. त्यासाठी दिल्ली पोलिसांचे सहकार्य मिळत आहे. 

ट्रिटमेंटमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारांबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, एलएनजेपी आणि जी. बी. पंत रुग्णालयात केवळ कोरोनाचे रुग्ण असतील. सरकारी रुग्णालयात 2450 खाट, तर खासगीमध्ये 400 खाट कोरोनासाठी आरक्षित ठेवले आहेत. यात मॅक्स, अपोलो, गंगाराम हॉस्पिटलचा समावेश आहे.