Thu, Apr 25, 2019 05:31होमपेज › National › चंद्राबाबूंनी एक दिवसाचे उपोषण सोडले

चंद्राबाबूंनी एक दिवसाचे उपोषण सोडले

Published On: Feb 11 2019 9:39AM | Last Updated: Feb 11 2019 12:45PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी (दि.११) सकाळी ८ वाजता सुरू केलेले एक दिवसाचे उपोषण रात्री ८.२० वाजता माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडले. विशेष म्हणजे त्यांच्या या उपोषणाच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर विरोधकांची एकजूट पुन्हा एकदा पहायला मिळाली. 

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला. आंध्र भवनमध्ये त्यांनी सकाळी ८ वाजता उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी नायडूंनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिवसभर त्यांचे उपोषण सुरू राहिले. 

या दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादीचे मुलायम सिंह यादव, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ ब्रायन, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अन्य नेत्यांनी आंध्र भवनमध्ये जाऊन नायडू यांना पाठिंबा दिला.

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी नायडू यांनी केली आहे. आंध्रचे विभाजन झाल्याने तसेच विभाजनावेळी आंध्रावर अन्याय झाल्याने चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम केला होता.