Fri, Aug 23, 2019 16:19होमपेज › National › अभिनंदन वर्धमान यांची वीरचक्र पुरस्कारासाठी शिफारस

अभिनंदन वर्धमान यांची वीरचक्र पुरस्कारासाठी शिफारस

Published On: Apr 21 2019 1:40AM | Last Updated: Apr 21 2019 12:20AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत शिरलेले पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणारे आणि पाकच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची हवाई दलाकडून वीरचक्र या शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 

सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची काश्मीरमधील हवाई दलाच्या तळावरून पश्‍चिम सेक्टरमधील हवाई तळावर नियुक्‍ती करण्यात येणार आहे. 

देशासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सैन्य दलांतील जवानांना दिले जाणारे परमवीर चक्र, महावीर चक्र या दोन सर्वोच्च शौर्य पुरस्कारानंतर वीरचक्र हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अभिनंदन यांची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर, बालाकोट येथे मिराज 2000 लढाऊ विमानांसह हवाई हल्‍ले करणार्‍या 12 वैमानिकांची वायुसेना पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे.  

विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे विमान पाडल्यानंतर त्यांचे विमानही पाकव्याप्‍त काश्मीरमध्ये पडले होते. पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही त्यांनी आपल्या कणखरपणाचे दर्शन घडवले होते. 

शत्रू राष्ट्राला देशासंबंधीची कोणतीही संवेदनशील माहिती कळू दिली नव्हती. त्यानंतर ते सुखरूप मायदेशात परतले होते. मात्र, तरीही त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांची श्रीनगर येथील हवाई तळावरून पश्‍चिम सेक्टरमधील भारत-पाक सीमेवरील दुसर्‍या महत्त्वाच्या हवाई तळावर बदली करण्यात आली आहे. मात्र, हा हवाई तळ नक्‍की कुठला आहे, हे सांगण्यात आलेले नाही.