Fri, Mar 22, 2019 03:57
    ब्रेकिंग    होमपेज › National › चलन तुटवडा; लग्नपत्रिका दाखवल्यानंतर बँकेने दिले पैसे

चलन तुटवडा; लग्नपत्रिका दाखवल्यानंतर बँकेने दिले पैसे

Published On: Apr 17 2018 12:51PM | Last Updated: Apr 17 2018 12:49PMचंपावत (उत्तराखंड) : पुढारी ऑनलाईन

देशातील एटीएममध्ये नोटांचा ठणठणाट असल्याने पुन्हा एकदा नोटाबंदीच्या काळातील अनुभव लोकांना येत आहेत. बँकेत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दिसत आहे. उत्तराखंडमध्ये  एका बँकेने लग्नपत्रिका दाखवल्यानंतर पैसे दिल्याने लोकांची नोटाबंदीची आठवण पुन्हा ताजी झाली. 

उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यात रमेश राम नावाचा तरुण बँकेत पैसे काढण्यासाठी पोहचला. पण त्याच्या पदरी पैसे नाही तर निराशा पडली. त्याने १० हजार रुपये काढायचे आहेत असे सांगितल्यानंतर बँकेने तेवढे पैसे देण्यास नकार दिला. बँक एकावेळी २ हजार रुपये देण्यास तयार होती. नातेवाईकाच्या लग्नासाठी पैसे हवे असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना जिल्हा बँकेत जाण्याचा सल्ला देण्यात आला. जेव्हा ३५ किलोमीटर प्रवास करुन तो बँकेच्या जिल्हा कार्यालयात पोहचला. लग्नपत्रिका दाखवल्यानंतर त्याला पूर्ण रक्कम देण्यात आली. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने अनेकांच्या लग्नात या चलन तुटवड्‌याने लग्न समारंभावर परिणाम होत आहे. 

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर बँका सुरु झाल्या तेव्हा पैसे काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. एटीएममध्ये पैसे संपल्याने बँकेतून जितके मिळतील तितके पैसे काढण्यास खातेदारांनी सुरुवात केली आहे. मात्र बँकेत भरणा करणाऱ्यांपेक्षा पैसे काढण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने चलन तुटवडा निर्माण झाला आहे. 

Tags : ATM, Empty, Bank, Cash, Wedding Card, Uttarakhand, India