Mon, Jun 17, 2019 10:25होमपेज › National ›  जाणून घ्या : जेएनयूसारखाच 'तो'होणारा प्रकार अलीगड मुस्लिम विद्यापीठाने 'हाणून' पाडला!

 जाणून घ्या : जेएनयूसारखाच 'तो'होणारा प्रकार अलीगड मुस्लिम विद्यापीठाने 'हाणून' पाडला!

Published On: Oct 12 2018 5:26PM | Last Updated: Oct 12 2018 5:26PMअलीगड : पुढारी ऑनलाईन

जवाहरलाल लाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दहशतवादी अफझल गुरूसाठी शोकसभा घेतल्याने चांगलेच रणकंदन माजले होते. तशाच पद्धतीने अलीगढ मुस्लीम विद्यापीठात (एएमयू) होणारा प्रकार प्रशासनाने शिताफीने हाणून पाडला. एएमयूमधून पीएच.डी अभ्यासक्रम मध्येच सोडून दहशतवादी झालेल्या मनन बशीर वाणीचा काल उत्तर काश्मीरमध्ये लष्कराने खातमा केला होता. या पार्श्वभूमीवर एएमयूमध्ये काश्मीरस्थित विद्यार्थ्यांनी मननसाठी प्रार्थना आयोजित करण्याचा घाट घातला होता. 

हा प्रकार लक्षात येताच एएमयू प्रशासनाने तो हाणून पाडला. संबंधित नऊ विद्यार्थ्यांना नोटीस सुद्धा धाडण्यात आली आहे.  याचवर्षी जानेवारी महिन्यात मननची एएमयूमधून दहशतवादी संघटनेत सामील झाल्याने हकालपट्टी करण्यात आली होती. मननने सोशल मीडियावर हिझबुल मुझाहिद्दीन या दहशतवादी संघटनेमध्ये दाखल झाल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. 

नऊ विद्यार्थ्यांना नोटीस धाडण्यात आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. चौकशी अहवालानंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती एएमयूचे जनसंपर्क अधिकारी  एम. शेफी किडवई यांनी दिली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी प्रार्थनेसाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर ५० ते ६० विद्यार्थी जमा झाले. यावेळी माजी विद्यार्थीसुध्दा एएमयूच्या ग्रंथालय परिसरात जमा झाले. त्यांनी अशा प्रकारे प्रार्थना केल्यास एएमयूची प्रतिष्ठेला धक्का लागेल असे सांगत विरोध केला. त्यांच्या आवाहनाला काही विद्यार्थ्यांनी समर्थन दिले, तर काही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. याचवेळी एएमयू प्रशासनाची निरीक्षक टीम दाखल झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि सुरक्षारक्षकांना बोलवून सौम्य बळाचा  वापर करून त्यांना पांगवले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.