Wed, Feb 20, 2019 15:51होमपेज › National › समलैंगिकता संस्कृतीचा भाग; वाचा कलम ३७७वरील युक्तीवाद!  

समलैंगिकता संस्कृतीचा भाग; वाचा कलम ३७७वरील युक्तीवाद!  

Published On: Jul 12 2018 3:16PM | Last Updated: Jul 12 2018 3:16PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आपल्या संस्कृतीत 'एलजीबीटी' समुदायाचे अस्तित्व आहे. समलैंगिकता हा विषय भारतीय संस्कृतीत नवीन नाही. अनेक देशांनी समलैंगिकता स्वीकारली आहे, असा युक्तिवाद आज वकिल अशोक देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

समलैंगिकता हा गुन्हा ठरविणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. एका याचिकाकर्त्याची बाजू मांडताना वकील देसाई यांनी समलैंगिकता हा विषय आपल्या संस्कृतीत नवीन नसल्याचे न्यायालयात सांगितले. 

सुनावणी दरम्यान न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी आपले मत नोंदविताना म्हटले की, कौटुंबिक, समाजातील दबावामुळे 'एलबीजीटीं'ना जबरदस्तीने भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर लग्न करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना मानसिक आघात सोसावा लागतो.

न्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले, की एलजीबीटी समुदायाला समाजात भितीच्या छायेखाली जगावे लागत आहे. त्यांना मानसिक आघात सोसावा लागत आहे.

आयपीसीतील कलम ३७७ नुसार समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत दोषी ठरविल्यास १० वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. हे कलम घटनाबाह्य ठरविण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यावर एकत्रीत सुनावणी सुरू आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने समलैगिकतेवर २ जुलै २००९ मध्ये निकाल दिला होता. एकमेकाच्या सहमतीने ठेवलेले संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात निवाडा होणार आहे.