Wed, Jul 17, 2019 16:37होमपेज › National › आठवडाभर उपाशी होती 'अवनी'...!

आठवडाभर उपाशी होती 'अवनी'...!

Published On: Nov 08 2018 7:29PM | Last Updated: Nov 08 2018 7:29PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

वन खात्याने मारलेल्या अवनी वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार अवनीला जेव्हा ठार करण्यात आले त्याच्या आधी आठवडाभर ती उपाशी होती. आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना असे वाटते आहे की, ज्या अर्थी अवनी वाघीण उपाशी होती; त्यामुळे तिचे बछडेही उपाशी असणार, त्यामुळे त्यांचीही वाचण्याची शक्यता कमी आहे.

हा अहवाल हाती येताच वनविभागाने शंभरहून अधिक अधिकाऱ्यांना त्या बछड्यांना शोधण्यासाठी रवाना केले आहे. अवनीला ठार केल्यापासून वन विभाग तिच्या बछड्यांच्या शोधात असून अद्याप ते सापडू शकले नाहीत. अवनी वाघिणीला जिथे गोळी मारण्यात आली तेथील त्वचा आणि मांसपेशीचे नमुने केमिकल आणि बॅलेस्टीक तपासणी करिता विभागीय फॉरेन्सीक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. अवनीच्या डाव्या जांघेपासून काढण्यात आलेली सुई आणि तिची मांसपेशी यांची तपासणी करण्यात येणार असून अवनीला ठार मारण्यापूर्वी तिला बेशुद्ध करण्यासाठी इंजक्शन देण्यात आले होते का याचा तपास केला जाणार आहे. 

याशिवाय अवनी वाघिणीची लघवी, हृदय, रक्त, मृत शरीरातून काढण्यात आलेली दोन काडतूसे, गोळी लागलेल्या ठिकाणची मांसपेशी असे तपासणीसाठी लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. या वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी वन विभाग तसेच राज्य सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. अवनी वाघिणीला न मारता तिला बेशुद्ध करुन पकडण्यात आले असते असाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. यातच केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातही याच मुद्द्यावरुन वाक्युद्ध जुंपले आहे. यातच आता अवनी वाघिणीच्या शवविच्छेदनाचा अहवाल पुढे आल्याने वनविभाग आणखी अडचणीत येऊ शकते.