Sat, Jan 18, 2020 23:17होमपेज › National › डॉक्टरांच्या सुरक्षेबाबतच्‍या याचिकेवर आज सुनावणी

डॉक्टरांची सुरक्षा; याचिकेवर आज सुनावणी

Published On: Jun 18 2019 9:01AM | Last Updated: Jun 18 2019 9:01AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

देशभरातील सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी (ता.१८) सुनावणी होणार आहे.

डॉक्टरांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सरकारने नियुक्त केलेले सुरक्षा कर्मचारी नेमण्याचे निर्देश केंद्राच्या आणि पश्चिम बंगालच्या गृह व आरोग्य मंत्रालयांना द्यावेत, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. तसेच कोलकात्यातील एनआरएस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश पश्चिम बंगाल सरकारला द्यावे, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील अलख श्रीवास्तव यांनी याचिकेवर तातडीने सुनावणीची विनंती केली असता, न्या. दीपक गुप्ता व न्या. सूर्यकांत यांच्या सुट्टीतील खंडपीठाने हे प्रकरण मंगळवारी सुनावणीला घेण्याचे मान्य केले आहे. या सुनवाणीकडे देशभरातील डॉक्‍टरांचे लक्ष लागले आहे.

काय आहे ही घटना?

कोलकात्याच्या एका रुग्णालयात १० जून रोजी रुग्ण मरण पावल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तेथील डॉक्टरांवर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. यानंतर पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही याचिका करण्यात आली आहे.