होमपेज › Nashik › पाच खुनांसह १५ गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद

पाच खुनांसह १५ गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद

Published On: Nov 15 2017 1:51AM | Last Updated: Nov 15 2017 1:38AM

बुकमार्क करा

पंचवटी : वार्ताहर 

मंदिरात दरोडा टाकून पुजार्‍याचा तसेच पत्नीचा असे जवळपास पाच खून करण्याबरोबरच इतर वेगवेगळ्या तब्बल 15 गुन्ह्यांत सात ते आठ महिन्यांपासून फरार असलेल्या उत्तर प्रदेशच्या संशयित कुख्यात गुंडाला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंबड परिसरात एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करून वास्तव्य करणार्‍या या परप्रांतीय गुंडामुळे परप्रांतीय गुन्हेगारांचे ‘नाशिक कनेक्शन’ उजेडात आले आहे. 

असगर बदलू शेख (26, राहणार हकीम गाव, ता. नानपारा, जिल्हा बहराईच, उत्तर प्रदेश) असे या संशयिताचे नाव आहे. हा सराईत गुन्हेगार संजीवनगर अंबड लिंकरोड येेथे एका हॉटेलमध्ये काम करून बाजूलाच एक खोली भाड्याने घेऊन वास्तव्यास आहे, या गुप्त माहितीद्वारे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले यांनी केलेल्या कारवाईत हा संशयित पोलिसांच्या तावडीत सापडला. 

सोमवारी (दि 13) रात्रीच्या सुमारास अंबड लिंकरोड येथील संजीवनगर येेथे गुन्हे शोधपथकाने सापळा रचला. संशयित असगर शेख याला पकडण्याचा प्रयत्न करताच त्याने पोलिसांना धक्‍का मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावध असलेल्या पोलिसांनी वेळीच सावध होऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देताच त्यांनी हा संशयित गेल्या आठ महिन्यांपासून फरार असल्याचे सांगितले.