होमपेज › Nashik › डेंग्यू रुग्णसंख्येत नाशिक तिसर्‍या स्थानी

डेंग्यू रुग्णसंख्येत नाशिक तिसर्‍या स्थानी

Published On: Nov 15 2017 1:51AM | Last Updated: Nov 15 2017 1:44AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शहरात आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. डेंग्यूने तर शहरात जणू थैमानच घातल्याची स्थिती निर्माण झाली असून, गेल्या 12 दिवसांत शहरात डेंग्यूचे 126 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात नाशिक शहराचा तिसरा क्रमांक लागला आहे. यावरूनच शहराच्या आरोग्याची स्थिती लक्षात येऊ शकते. शहरातील आरोग्याच्या प्रश्‍नावरून महापौरांनी मंगळवारी (दि.14) तातडीची बैठक बोलावून आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना धारेवर धरत कामात सुधारणा न केल्यास निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. शहरात आदर्श घंटागाडी योजना तसेच पेस्ट कंट्रोलच्या माध्यमातून आरोग्याबाबत काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. पेस्ट कंट्रोलचा ठेका तीन वर्षांसाठी असून, त्यासाठी 19 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे असे असताना शहरात कुठेही औषध फवारणी केली जात नसल्यानेच डेंग्यूसह विविध साथीचे आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचे आरोप सदस्यांनी केले. 

शहरातील डेंग्यूच्या स्थितीविषयी जीवशास्त्रज्ञ डॉ. राहुल गायकवाड यांना महापौर रंजना भानसी यांनी विचारले असता राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत नाशिक शहराचा तिसरा क्रमांक लागत असल्याचे सांगितले. घरभेटी आणि पाणीसाठे तपासणी केली जात असल्याचे सांगताच सदस्यांनी गायकवाड यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना धारेवर धरले. आरोग्यासंदर्भात योग्य काळजी न घेतल्यास आरोग्य अधिकार्‍यासह विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौरांनी दिला. बैठकीस स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, आरोग्य समिती उपसभापती योगेश शेवरे, पश्‍चिम सभापती हेमलता पाटील यांच्यासह आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते.