Wed, Jun 03, 2020 17:11होमपेज › Nashik › गोदा प्रदूषण करणार्‍यांवर ३३ पोलिसांची नजर

गोदा प्रदूषण करणार्‍यांवर ३३ पोलिसांची नजर

Published On: Apr 21 2019 1:41AM | Last Updated: Apr 21 2019 1:41AM
नाशिक : प्रतिनिधी

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हरितकुंभ संकल्पना तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गोदा प्रदूषण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार परिमंडळ एकमधील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 4 पोलीस अधिकारी आणि 29 कर्मचारी नदीकिनारी गस्त घालतील. तसेच प्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोदापात्र आहे. नदीकिनारी ठिकठिकाणी गोदा प्रदूषण होत असते, त्यात नदीकिनारी कपडे-भांडे-वाहने, जनावरे धूणे, कचरा-प्लॅस्टिक टाकण्यासोबत इतर प्रकारे प्रदूषण केले जाते. अशा प्रदूषण वाढवणार्‍या व्यक्‍तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे पोलिसांनी पोलीस ठाणे निहाय पथके नेमण्यात आली आहेत. त्यात पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि पुरुष व महिला पोलीस कर्मचारी आहेत. नागरिकांनी गोदा प्रदूषण करू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिला आहे.

पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त
सरकारवाडा : 1 पोलीस उपनिरीक्षक, 4 पुरुष व 2 महिला कर्मचारी.  
आडगाव  : 1 पोलीस उपनिरीक्षक, 6 पुरुष व 1 महिला कर्मचारी. 
पंचवटी : 1 पोलीस उपनिरीक्षक, 3 पुरुष आणि 1 महिला कर्मचारी.  
भद्रकाली : 4 पुरुष आणि 2 महिला पोलीस कर्मचारी. 
गंगापूर : 1 पोलीस उपनिरीक्षक, 5 पुरुष व 1 महिला कर्मचारी.