Fri, Sep 20, 2019 22:28होमपेज › Nashik › प्रेयसीच्या वडिलांचा प्रियकराकडून खून

प्रेयसीच्या वडिलांचा प्रियकराकडून खून

Published On: Apr 15 2019 1:57AM | Last Updated: Apr 14 2019 11:02PM
नांदगाव : प्रतिनिधी 

प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीच्या वडिलावर कुर्‍हाडीने घाव करून खून केला, तर तिच्या भावावर वार करीत गंभीर जखमी केले आहे. रणजित दामू आहेर असे मयताचे नाव आहे. तर तुषार रणजित आहेर (वय 19) हा गंभीर जखमी आहे. संशयिताचे नाव नागेश श्रावण पवार असे आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित नागेश श्रावण पवार याला रणजित आहेर यांनी आपल्या मुलीबरोबर रात्रभर फिरत असल्याचे पाहिले होते. याचा जाब त्यांनी आपल्या मुलीला विचारला. मात्र, तिने ही बाब नाकारली आणि खरे खोटे करण्यासाठी नागेश पवार याला बोलावले. तो आला असताना रणजित आहेर यांनी नागेश याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा राग आल्याने संशयित नागेश याने हातात कुर्‍हाड घेऊन आला. त्याने घरासमोर बसलेल्या रणजित आहेर यांच्यावर वार केला. घाव मानेवर वर्मी बसल्याने आहेर यांचा जागीच मृत्यू झाला. तर रणजित यांचा मुलगा तुषार हा वडिलांना वाचविण्यास गेला. त्यांच्यावरही नागेश याने कुर्‍हाडीने घाव घातला. तुषार याच्या डाव्या हाताला तो घाव बसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळविली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्यानंतर नागेश पसार झालेला होता. या घटनेमुळे मांडवड गावात तणाव निर्माण झाला होता. मारेकर्‍याला अटक करण्याच्या मागणीसाठी मयताचे नातेवाईक  पोलिसात आले होते.