होमपेज › Nashik › नाशिकरोड येथील डी. एस. कोठारी कन्या शाळेला आग

नाशिकरोड येथील डी. एस. कोठारी कन्या शाळेला आग

Published On: May 04 2019 6:50PM | Last Updated: May 04 2019 6:59PM
नाशिकरोड : पुढारी ऑनलाईन

नाशिक रोड येथील जेल रोड रस्त्यावर असणाऱ्या डी. एस. कोठारी कन्या शाळेत आज दुपारी चार-सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही प्राणहानी हानी झाली नसली तरी वित्तहानी झाली आहे. नुकसान काय आणि किती झाले हे अद्याप समजू शकलेले नसून आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. 

ही आग शार्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज आहे. जेलरोड येथे कलानगर शेजारी कोठारी कन्या ही मुलींची शाळा आहे. आज दुपारी चार ते सव्वाचारच्या वाजण्याच्या सुमारास शाळेच्या दुस-या मजल्यावरुन धूर येत असल्याचे परिसरातील रहिवाशांना दिसले. शाळेला उन्हाळी सुट्या असल्याने विद्यार्थी, शिक्षक शाळेत नव्हते. त्यामुळे नागरिकांनी कन्नू ताजणे यांना ही माहिती दिली. ताजणे यांनी मुन्नाभाई शेख, आर. आर. पंडित यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. नाशिकरोड पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. दुस-या मजल्यावरील फर्निचर, भंगार साहित्याने पेट घेतला होता. 

महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाचे दोन बंब आणि प्रेसचा बंब असे तीन बंब दाखल झाले. अग्नीशमन दलाचे केंद्र प्रमुख ए. यु. जाधव, मनोज साळवे, बाजीराव कापसे, अशोक निलीमणी, राजू आहेर, अंबादास मांडे, फकिरा भालेराव, केशव उगले आदींनी आग नियंत्रणात आणली. मुख्याध्यापिका व काही शिक्षकही उपस्थित होते. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एन. ए. माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज साळवे, पोलिस, तेलकर, महेश सावळे, विशाल पाटील, जनार्दन गायकवाड यांनी आग नियंत्रणासाठी मदत केली.