Fri, Sep 20, 2019 21:54होमपेज › Nashik › 'इंजिन बंद...घड्याळाचे बारा वाजून भुजबळही जेलमध्ये जातील' 

'इंजिन बंद...घड्याळाचे बारा वाजून भुजबळही जेलमध्ये जातील' 

Published On: Apr 27 2019 6:41PM | Last Updated: Apr 27 2019 7:04PM
नाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपुरते इंजिन भाड्याने घेतले असून, हे इंजिन आता हालत नाही, बोलत नाही की चालतही नाही. हीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होणार आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे बारा वाजलेले असतील आणि भ्रष्टाचार करून काळा पैसा जमविणारे छगन भुजबळही पुन्हा जेलमध्ये असतील, अशा प्रकारचा इशारा देत राज ठाकरेंचे दुकान बंद झाल्यानेच ते नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपला राग व्यक्‍त करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

शिवसेना-भाजपा, रिपाइं युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, तीन टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन निवडणुकीआधी म्हणाले मीच बॅट्समन. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी काही गुगली टाकली की या कॅप्टनला मैदानातून पळ काढत पॅव्हेलियनमध्ये बसून बारावा खेळाडू म्हणून सामना पाहण्याची वेळ आल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, त्यांना भाड्याने वक्‍ता आणावा लागला. पूर्वी लोक सायकल, मोटारसायकल भाड्याने घ्यायचे आता रेल्वेचे इंजिन भाड्याने घेत आहेत. पण, नुसत्या तोंडाच्या वाफेवर इंजिन चालत नाही. आता हे इंजिन गल्लीतच राहणार आहे. 

भुजबळांवर हल्ला करताना मुख्यमंत्री म्हणाले, भुजबळांना जेलमध्ये जाण्याची हौस असल्याने आता ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे सांगत न्याय देवताच त्यांचा न्याय करणार आहे. भुजबळांनी अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभा केलेला असला तरी नाशिकची जनता मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी आहे. शहीद जवान, पुलवामा व उरी येथील दहशतवादी हल्ले आणि त्याला भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तराचा मुद्दाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यावर ठोस कार्यवाही करण्याऐवजी आघाडी शासनाने शोक व्यक्‍त करत दुर्लक्ष केले. 
त्याच पद्धतीने उरी आणि पुलवामा येथील हल्ल्यानंतर आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवला. कारण आपल्या पंतप्रधानांनी जवानांना अधिकार देत त्यांचे हात खुले केले होते. पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यावर इतर देशांनी जवानांवर विश्‍वास दर्शविला परंतु, पाकिस्तान आणि आपल्याकडील महाखिचडी म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अविश्‍वास दाखवित जवानांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. 

सभेच्या व्यासपीठावर शिवसेना नेते संजय राऊत, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रंजना भानसी, बबन घोलप, भाऊसाहेब चौधरी, प्रा. सुहास फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आदी उपस्थित होते.  

अन् भुजबळांची केली नक्‍कल 

मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण भाषणात त्यांचा रोख छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्यावरच होता. भुजबळांवर टीका करताना त्यांनी भुजबळांची नक्‍कल करून दाखवताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. भुजबळांसारखा नटसम्राट अख्ख्या महाराष्ट्रात पाहिला नसल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. 

नोटाबंदीने राज ठाकरेंचे दुकान बंद

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंवर सडकून टीका केली. ठाकरे यांच्याकडून सातत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरेंना नरेंद्र मोदी यांनी पछाडले आहे. नोटाबंदीमुळे आजवर जोरात सुरू असलेले राज ठाकरे यांचे दुकान बंद झाल्याने राज ठाकरेंचा पंतप्रधानांवर राग आहे. 

आमची कुठेच शाखा नाही

एक आमदार होता, तोही शिवसेनेत गेला. आता मनसे फक्‍त नावाला उरला आहे कारण आमची कुठेच शाखा नाही आणि उमेदवारही नाही, अशी अवस्था मनसेची झाली आहे. नाशिकमध्ये इतके चांगले काम केले मग नाशिककरांनी तुम्हाला घरी का बसवले, असा प्रतिप्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना विचारला. इथली कामे भाजपा- शिवसेना युतीच्या राज्य सरकारने दिलेल्या पैशातून उभी राहिली आहे, हे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. 

दोन हजार कोटी राज्याने दिले 

शुक्रवारी (दि.26) झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी नाशिक मनपात सत्ता असताना केलेल्या विकासकामांचे व्हिडिओ दाखविले होते. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले कुंभमेळ्यांतर्गत झालेल्या विकासकामांसाठी राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचा निधी मनपाला दिला. याच निधीतून कामे होऊ शकली. महापालिकेकडे पैसा नसल्याचे कारण देत हेच राज ठाकरे त्यांचे 40 नगरसेवक घेऊन माझ्याकडे आले होते. त्यावेळी मनपा आर्थिक अडचणीत असल्याने मनपाचा हिस्साही राज्याने द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. 

‘होय, मी पालकत्व घेतलेय’ 

नाशिक दत्तक घेतल्यावरून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. आपण नाशिकचे पालकत्व घेतले आहे आणि त्या नात्यानेच आज शहरात दोन हजार कोटींची कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 485 कोटी स्मार्ट सिटीसाठी दिले असून, 123 कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. सीसीटीव्ही, स्काडा यंत्रणा, कमांड कंट्रोल सिस्टिम, गावठाण भागातील रस्ते, पाणीपुरवठा व ड्रेनेज, गोदा सुशोभीकरण, इलेक्ट्रिकल बससेवा, यांसारखी कामे येत्या काळात मार्गी लागणार आहेत. शहरात प्रथमच इंटिग्रेटेड (एकीकृत) ट्रान्सपोर्ट सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या यंत्रणेचे भूमिपूजन केले जाईल, तसेच गंगापूर गाव, पिंपळगाव खांब येथील एसटीपी सेंटर, मुकणे येथून 16 किमीची थेट पाइपलाइन, पाथर्डी येथे ट्रान्स्पोर्ट, दोन भव्य क्रीडांगणे, अत्याधुनिक नाट्यगृह अशा विविध विकासकामांची जंत्री सादर करत मुख्यमंत्र्यांनी ‘होय, मी नाशिकचे पालकत्व घेतलंय’चा पुनरुच्चार केला.