होमपेज › Nashik › शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या संस्थांवर कारवाई : मुख्यमंत्री

शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या संस्थांवर कारवाई : मुख्यमंत्री

Published On: Dec 26 2018 4:12PM | Last Updated: Dec 26 2018 4:12PM
धुळे : प्रतिनिधी 

राज्यात ऑनलाईन शिष्यवृती योजना सुरु झाल्याने लाखो बोगस खाते पकडण्यात आली, यासंदर्भात एसआयटीने चौकशी करुन दिलेल्या अहवालानंतर कारवाई करण्यात  येत आहे, काही संस्था जाणीवपूर्वक ऑफलाईन अर्ज पाठविण्यास दिरंगाई करीत आहेत. अशा संस्थांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास संस्थांना जवाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धुळ्यात दिला.

धुळ्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेसह दुष्काळ आढावा घेण्यासाठी बैठकीनंतर मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार हिना गावित, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात दोन वर्षांपर्यंत शिष्यवृती दिली जात नव्हती. पण आता पात्र विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज पाठविण्यास दिरंगाई करणा-या संस्थांना जबाबदार धरण्यात येईल, गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

केंद्र शासनाने २०२२ पर्यंत आवास योजनेसाठी एसीसीसीची यादी संपविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २०१९ पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर देवून ही यादी पुर्ण करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान पोलिस विभागाच्या आढाव्यात जिल्हयातील आमदारांना प्रवेश दिला नव्हता. याच वेळी आमदार अनिल गोटे हे बैठकीसाठी आले. त्यांना प्रांत गणेश मिसाळ यांनी ही माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी छेडले असता आमदार गोटे यांनी या बैठकीत पैसे कसे घ्यायचे याची चर्चा सुरु असल्याची टिका केली.