होमपेज › Nashik › चांदवड-मनमाड रस्त्याचे भाग्य उजळणार

चांदवड-मनमाड रस्त्याचे भाग्य उजळणार

Published On: Jan 09 2019 2:17AM | Last Updated: Jan 09 2019 2:13AM
चांदवड : सुनील थोरे

चांदवड ते मनमाड दरम्यानच्या 24.5 किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणास केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा झेंडा दिला आहे. या दुपदरी रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण होणार असून, यासाठी तब्बल 121 कोटी 28 लाख रुपयांची मंजुरी दिल्याची माहिती चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. त्यामुळे चांदवड ते मनमाड हा रस्ता नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक किलोमीटर अंतरावरील काँक्रीटचा रस्ता म्हणून नावारूपास येणार आहे.

चांदवड ते मनमाड रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवाशांना प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले होते. यासाठी तीन ते चार वेळा या रस्त्यावरील खड्डे देखील बुजविण्यात आले होते. मात्र, रस्त्यांवरील रहदारी, ऊन, वारा व पाऊस यामुळे या रस्त्यावर दरवर्षी मोठमोठे खड्डे पडले होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडले आहेत. चांदवड- मनमाड रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणीदेखील नागरिकांनी वारंवार आमदार आहेर यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार आमदार आहेर यांनी गडकरी यांची भेट घेत चांदवड-मनमाड रस्त्याच्या नूतनीकरणासंदर्भात चर्चा केली होती. याच दरम्यान केंद्र सरकारने 3 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेनुसार साक्री-सटाणा-देवळा-चांदवड-मनमाड-येवला-कोपरगाव-शिर्डी-राहुरी-अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड-शिरापूर-बीड या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 घोषित केले होते. हा रस्ता राष्ट्रीय रस्ता घोषित झाल्यापासून आमदार आहेर हे चांदवड ते मनमाड रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी ना. गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. त्याची दखल घेत ना. गडकरी यांनी चांदवड-मनमाड या 24.5 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास मंजुरी दिली आहे.

या मार्गाच्या काँक्रिटीकरणास मंजुरी दिल्याबद्दल खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, राजदेरवाडीचे सरपंच मनोज शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शांताराम भवर, नांदूरटेकचे सरपंच प्रभाकर ठाकरे, भुत्याणे सरपंच गणेश महाले, सोग्रसचे सरपंच सुभाष पुरकर, विजय धाकराव आदींच्या शिष्टमंडळाने दिल्लीला जाऊन गडकरी यांची भेट घेत आभार मानले.

चांदवड शहरातून गेलेल्या चांदवड-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई-आग्रा महामार्ग ते लासलगाव-चांदवड-मनमाड या चौफुलीदरम्यानचा रस्ता हा चौपदरी असणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. चांदवड शहरातील सबस्टेशनजवळील चांदवड-लासलगाव-मनमाड चौफुलीवर सर्कल असणार आहे.चांदवड ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण काँक्रिटीकरण होणार असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी मजबूत होणार आहे. काँक्रिटीकरणामुळे रस्ता दीर्घकाळ टिकण्यास फायदा होणार आहे. यामुळे रस्त्याने प्रवास करणे नागरिकांना अत्यंत सुखकर होणार आहे. चांदवड -मनमाड रस्त्याचे नूतनीकरण होणार असल्याने नागरिकांनी आमदार डॉ. राहुल आहेरांचे आभार मानले.