Mon, Sep 16, 2019 11:50होमपेज › Nashik › कोकणच्या स्वच्छतेचे उलगडले पैलू!

कोकणच्या स्वच्छतेचे उलगडले पैलू!

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:28PMनाशिक : संदीप दुनबळे

एका बाजूला निळाशार सागरी किनारा... दुसरीकडे उभ्या असलेल्या अखंड पर्वतरांगा... हिरवाईने नटलेलं नैसर्गिक सौंदर्य... निसर्गाचं अस लेणं लाभलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता दिसून आलीच शिवाय देशाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांची ठेवली जाणारी बडदास्त नजरेत भरणारीच आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या जिल्ह्यांमधील काही ग्रामपंचायतींना दिलेल्या भेटीत तेथील स्वच्छतेविषयीचे अनेक पैलू उलगडले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत या दोन जिल्ह्यांमध्ये झालेले काम कौतुकास्पद असेच आहे. वैयक्‍तिक शौचालयाचा वापर व सातत्य, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याबाबतीतही येथे जोमाने काम सुरू असल्याचे दिसून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या वर्गातील किशोरी व शाळाबाह्य किशोरवयीन मुलींसाठी ‘उत्कर्षा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतातील पश्‍चिम प्रांतात व महाराष्ट्रात पहिला हागणदारीमुक्‍त जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्गने समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रम हाती घेऊन संपूर्ण स्वच्छतेकडे वाटचाल सुरू केली आहे. तसेच पहिला साक्षर व पर्यटन जिल्हा म्हणूनही सिंधुदुर्ग नावारूपास आला आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि  नैसर्गिक लावण्यांनी सजलेल्या या जिल्ह्यात पूर्वेला भक्‍कम अभेद्य पर्वतरांगा, पश्‍चिमेला 120 कि.मी.चा विस्तीर्ण निळाशार सागरी किनारा, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ सावंतवाडी, दोडामार्ग अशा आठ तालुक्यांचा आणि 743 गावांचा समावेश आहे. सन 2016-17 मध्ये हागणदारीमुक्‍त झालेला हा जिल्हा केवळ शौचालय बांधून थांबलेला नाही तर सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता, मासिक पाळीविषयी जनजागृती आदी उपक्रम याठिकाणी राबविण्यात येत आहेत. 

जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता करण्यात येत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 34 समुद्रकिनार्‍यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत  आहे. मेरी टाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियानांतर्गत 22 सागरी किनारा असलेल्या ग्रामपंचायतींना निधीही दिला आहे. या अभियानात सर्वात स्वच्छ किनारा स्पर्धा समाविष्ट आहे. 

स्वच्छतेबाबत  नागरिकच  जागरूक दिसून आले. उघड्यावर शौचालयाला जाण्याचे प्रमाण नगण्य आहे. प्रत्येक घरी शौचालय बांधलेले असून, त्याचा नियमित वापर करण्यात येतो. केवळ शौचालयच नाही तर घर व परिसर स्वच्छताही नियमित करण्यात येते. प्लास्टिक पिशव्या याठिकाणी हद्दपार झाल्या आहेत. कापडी व कागदी पिशव्यांचा वापर येथे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथील ग्रामपंचायतींना भेटी दिल्यावर सांडपाणी हा प्रश्‍न परसबाग करून सोडविण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायती वगळता सांडपाण्याचा प्रश्‍न दिसून आला नाही. कणकवली तालुक्यात साळस्ते गावची लोकसंख्या अवघी 878 इतकी आहे.

ग्रामपंचायतीला उत्पन्‍नाचा प्रमुख स्त्रोत हा घरपट्टी वसुली हा असून, वसुलीचे प्रमाण नव्वद टक्के इतके आहे. प्रत्येक घरात शौचालय आहे. सरपंच थेट जनतेने निवडून दिला असून, या पदावर सध्या अनुसूचित जातीची महिला विराजमान आहे. ‘झेरॉक्स’ संस्कृती याठिकाणी दिसून आली नाही. सरपंच स्वतःच कारभार हाकत असल्याची बाब लपून राहिली नाही. याच रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे हे देवस्थान प्रसिद्ध असून, याठिकाणी भाविकांचा नेहमीच ओघ असल्याचे नागरिक सांगतात.

 

Tags : nashik, nashik news, Konkan, cleanliness,