Mon, Jul 13, 2020 07:29होमपेज › Nashik › शहीद भगतसिंग सेनेने केला व्हॅलेंटाइन डे चा निषेध

शहीद भगतसिंग सेनेने केला व्हॅलेंटाइन डे चा निषेध

Published On: Feb 15 2019 1:48AM | Last Updated: Feb 14 2019 10:49PM
मालेगाव : वार्ताहर

देशात सर्वत्र मोठ्या उत्साहत प्रेमीयुगुल व्हॅलेंटाइन डे साजरा करत असताना येथील शहीद भगतसिंह सेनेच्या पदाधिकार्‍यांनी कॉलेज रोडवर जरा याद करो कुर्बानी या मथळ्याखाली व्हॅलेंटाइन डे च्या निषेधाचा बॅनर लावल्याने तो चर्चेचा विषय झाला होता.

पाश्‍चात्य चालीरीतींचे अनुकरण करत भारतातही व्हॅलेंटाइन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कॉलेज जीवनात वावरणारे मुले, मुली या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षीही शहरासह ग्रामीण भागात प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शहरातील विविध भेटवस्तू व फुलांच्या दुकानात युवक, युवतींनी भेटवस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे शहीद भगतसिंह सेनेचे संस्थापक सतीश ठाकूर, अध्यक्ष ललित बेडेकर, सत्यशील महिरे, सूरज कांबळे, अमोल खैरनार, सुशील कांबळे, प्रवीण बेडेकर, समाधान पाटील यांनी व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी येथील मसगा महाविद्यालयासमोर निषेधाचा फलक लावून या प्रेम दिवसाचा निषेध केला. या बॅनरवर जय हिंद, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद यासह ‘14 फरवरी को हमे फांसी की सजा सुनवाई गई थी दोस्तो, हमको ना भुलाना व्हॅलेंटाइन डे के जोश मे’ व जरा याद करो कुर्बानी असा मजकूर लिहिलेला होता. हा मजकूर असलेला बॅनर रस्त्याने ये-जा करणार्‍यांचे लक्ष वेधून घेत होता. 

इंग्रज सरकारने भारत भूमीचे लाडके पुत्र भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांना 14 फेब्रुवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. तो दिवस भारताच्या द‍ृष्टीने काळा दिवस ठरला. तोच 14 फेब्रुवारीचा दिवस आपण मात्र प्रेम दिवस म्हणून साजरा करतो हे आपले दुर्दैव असल्याचे सत्यशील महिरे यांनी सांगितले.