होमपेज › Nashik › माजी खासदार समीर भुजबळ यांच्या आईचेच नाव मतदार यादीतून गायब

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या आईचेच नाव मतदार यादीतून गायब

Published On: Apr 29 2019 12:12PM | Last Updated: Apr 29 2019 12:51PM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदार संघासाठी सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे. हेमंत गोडसे व समीर भुजबळ हे आजी-माजी खासदार समोरासमोर रिंगणात उतरल्याने त्यांच्यातील ही लढत तुल्यबळ अशीच होणार आहे. मतदारांनी सकाळच्या सत्रातच मतदानासाठी गर्दी केली आहे. दरम्यान, शहर व ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रावर मशिन उशिरा सुरु झाल्याच्या तक्रारी आल्या. तर, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या आईचेच नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. 

हिराताई भुजबळ या गेल्या 40 वर्षांपासून मतदान करत आहेत. मात्र, यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत त्यांचे नावच मतदार यादीतून गायब झाले आहे. या प्रकरणी स्वतः विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी आढावा घेतला. नाशिक लोकसभा मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा-सेना युतीचे हेमंत गोडसे, काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे समीर भुजबळ, अपक्ष माणिक कोकाटे तर वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यात काट्याची लढत आहे.

दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 8 उमेदवार नशिब आजमावत आहेत. भाजपा-सेना युतीच्या डॉ. भारती पवार, माकपाचे जे. पी. गावित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे धनराज महाले यांच्यात  प्रामुख्याने लढत होत आहे.