होमपेज › Nashik › कामगारच निघाला मास्टरमाइंड!

कामगारच निघाला मास्टरमाइंड!

Published On: May 15 2019 1:56AM | Last Updated: May 15 2019 12:20AM
मालेगाव : प्रतिनिधी

चंदनपुरी शिवारात पेट्रोलपंपावरील कॅशिअर लुटीचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या गुन्ह्याचा मास्टरमाइंड त्या पंपावरील कामगारच निघाला असून, त्याच्यासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर एक साथीदार फरार आहे. लुटीतले 70 हजार रुपयांसह दुचाकी, टॅब हस्तगत करण्यात आले आहे.

चंदनपुरी शिवारातील सावकार पेट्रोलपंपावरील कॅशिअर राहुल पारख  दि. 21 मार्च रोजी रात्री दिवसभराच्या हिशेबाचे दोन लाख 80 हजार रुपये मालकाकडे सुपूर्द करण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यावेळी मन्सुरा कॉलेज रोडवर शेतकी कॉलेज परिसरात दोन जणांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांच्याजवळील रोकड असलेली बॅग आणि टॅब पळवून नेला होता. या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला. खबर्‍यांमार्फत एका संशयिताविषयी पोलिसांना माहिती मिळाली. तो सुजन थिएटरजवळ येणार असल्याचे खबर्‍याने सांगितले. त्याप्रमाणे पथकाने सापळा रचला. संशयित शेख अझरुद्दीन शेख शहाबुद्दीन (20, रा. म्हाळदे शिवार, मालेगाव) हा दुचाकीवरून येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने युसुफ भुर्‍या (पूर्ण नाव माहिती नाही) याच्यासमवेत कॅशिअरला लुटल्याची कबुली दिली. हा सर्व प्लॅन त्याच पेट्रोलपंपावरील कर्मचारी अंकुश बापू वाघ (22, रा. कुंजर, चाळीसगाव, हल्ली रा. चंदनपुरी शिवार) याच्या माहितीवरून रचल्यातेही त्यांनी सांगितले. शेख अझरुद्दीन व वाघला अटक करण्यात आली. तिघांनी लुटीची रक्कम एकमेकांमध्ये वाटून घेतली होती. त्यापैकी 70 हजार रुपये, चोरीचा टॅब, दुचाकी असा एक लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक निरीक्षक संदीप दुनगहू, सहायक उपनिरीक्षक सुनील अहिरे, हवालदार सुहास छत्रे, वसंत महाले, राकेश उबाळे, देवा गोविंद, फिरोज पठाण, हेमंत गिलबिले, रतिलाल वाघ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.