Fri, Sep 20, 2019 21:55होमपेज › Nashik › धावत्‍या पंचवटी एक्‍स्‍प्रसचे डबे झाले वेगळे 

धावत्‍या पंचवटी एक्‍स्‍प्रसचे डबे झाले वेगळे 

Published On: Mar 07 2019 10:45AM | Last Updated: Mar 07 2019 10:45AM
डोंबिवली : प्रतिनिधी

कपलिंग तुटल्यामुळे मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस अर्धे डबे मागे ठेवून धावल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण जवळच्या पत्रीपुल परिसरात गुरुवारी सकाळी घडला. कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान पत्रीपुल परिसरात हा प्रकार घडला. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळेस जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि त्याचा धिम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. 

मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसने कल्याण स्टेशन सोडले आणि गाडी पत्रीपुल परिसरात आली. मात्र पत्रीपुल ओलांडताच कपलिंग तुटल्याने इंजिनासह 2 डबे पुढे गेले आणि उर्वरित गाडीचे डबे पाठीमागेच राहिले अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पंचवटीत बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने गाडी थांबवली. मात्र याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी धीम्या मार्गावर त्याचा ताण आला. या घटनेची माहिती कळताच रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन दुरुस्ती सुरू केली. या घटनेत कोणतीही वित्त हानी झाली नसल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र ऐन गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेची सेवा काही काळ खंडीत झाली होती. तांत्रिक विभागाने दुरूस्ती करून विलग झालेले डब्बे जोडल्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.