Sat, Jan 18, 2020 06:14होमपेज › Nashik › कांद्याल्या मिळाला ५१ पैसे प्रतिकिलो भाव, आलेली रक्‍कम मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर

कांद्याल्या मिळाला ५१ पैसे प्रतिकिलो भाव, आलेली रक्‍कम मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर

Published On: Dec 06 2018 10:11PM | Last Updated: Dec 06 2018 10:11PM
अंदरसूल (नाशिक) : वार्ताहर

कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. घसरणी संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्यातील नैताळे गावातील शेतकर्‍यांनी थेट पंतप्रधान कार्यालयास पाठविलेल्या मनिऑर्डरचे प्रकरण ताजे असतानाच येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शेतकऱ्याच्या कांद्यास अवघा ५१ पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्याने अंदरसूल येथील शेतकऱ्याने मुख्यमंत्री यांना २१६ रुपयांची मनिऑर्डर पोस्टाद्वारे पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सविस्तर असे कि येवला तालुक्यातील अंदरसुल येथील शेतकरी चंद्रकांत भिकनराव देशमुख यांनी पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने विकलेल्या कांद्यातून आलेल्या पैशाची मनिऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली. आधीच दुष्काळी परिस्थिती असल्याने कसा-बसा पिकविलेल्या कांदा  देशमुख यांनी येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल येथील उपबाजार समितीत बुधवार दि.५ डिसेंबर २०१८ रोजी ५ क्विंटल ४५ किलो कांदा विक्रीसाठी घेऊन गेले असता उपस्थित व्यापाऱ्यांनी सुरवातीला ५० रुपये क्विंटलची मर्यादा दिल्याने अखेर ५१ रुपये क्विंटलने त्यांचा कांदा लिलाव झाला. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडणार कसे व घर प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यास पडला त्यामुळे चंद्रकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे पोस्टाने २१६ रुपयांची मनिऑर्डर केली.

दरम्यान दि.५ डिसेंबर २०१८ रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती येवला अंतर्गत उपबाजार अंदरसुल येथे 
उन्हाळ कांदा - किमान 200 ते कमाल 550 सरासरी 300 ,
लाल कांदा - किमान 300 ते कमाल 882 सरासरी 750 ,
आवक - 40 ट्रॅक्टर 68 रिक्षा/पिकअप
एकूण आवक अंदाजे 10000 क्विंटल असा भाव होता.

कवडीमोल भावाने कांदा विकला: चंद्रकांत भिकन देशमुख

सद्यस्थितीत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने एकमेव कांद्यातून आलेल्या पैशातून घेतलेले कर्ज फेडण्यास व घर प्रपंचास मदत मिळाली असती परंतु माझा कांदा चांगल्याप्रतीचा असून देखील ५१ रुपये प्रतिक्विंटल अशा कवडीमोल भावाने कांदा विकला गेल्याने ती आशा देखील धुळीस मिळाली. शेतकरी आत्महत्या का करतो ? त्याचे उत्तर आज मला मिळाले. या कारणांमुळे कांद्याच्या पैशातून मी मुख्यमंत्री साहेबांना २१६ रुपयांची मनिऑर्डर केली.