होमपेज › Nashik › नीरव मोदीसारखा पळून गेलो नाही : छगन भुजबळ

नीरव मोदीसारखा पळून गेलो नाही : छगन भुजबळ

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 1:11AMनांदगाव/पिंपरखेड : 

जेव्हा बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी समीर भुजबळ यांची चौकशी सुरु होती तेव्हा  मी अमेरिकेत होतो. चौकशीला सहकार्यच केले. नीरव मोदीसारखा पळून जाणार नव्हतो, अशी टीका आमदार छगन भुजबळ यांनी केली. छगन भुजबळ, मीना भुजबळ, समीर भुजबळ, शेफाली भुजबळ, विशाखा भुजबळ व कुटुंबीयांनी शनिवारी शनिदेवाच्या मंदिरातल्या गाभार्‍यात असलेल्या शनीच्या वालुकामय पुरातन मूर्तीवर पुरोहितांच्या मंत्रोच्चाराच्या जयघोषात महाअभिषेक केला. श्री क्षेत्र नस्तनपूर येथील देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त माजी आमदार अ‍ॅड. अनिल आहेर यांनी आयोजित केलेल्या भुजबळ कुटुंबियांच्या स्वागत प्रित्यर्थ कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले, आपण राज्याचे पर्यटनमंत्री असताना जिल्ह्यातील बहुतांशी धार्मिक तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी नियोजन केले. त्याचा परिणाम आज या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांना चांगल्या सुविधा मिळू लागल्याने पर्यटन वाढलेले आहे, असे सांगताना आपल्यावर येणार्‍या संकटात परमेश्‍वर धावून येत असल्याने या संकटाशी मुकाबला करीत मिळालेले आयुष्य बोनस समजून समाजाच्या हितासाठी आपण मार्गी लावणार असल्याचे भावनिक उद‍्गार भुजबळ यांनी काढले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी आमदार जयवंत जाधव, साहेबराव पाटील, दिलीप इनामदार, जिल्हा परिषद सदस्या अश्‍विनी आहेर, संतोष गुप्ता, रमेश पगार, समाधान पाटील,  उदय पवार, खासेराव सुर्वे, डॉ. प्रवीण निकम, डॉ. प्रभाकर पवार आदी उपस्थित होते.