होमपेज › Nashik › खंडणीखोर भोंदूबाबास अटक

खंडणीखोर भोंदूबाबास अटक

Published On: Nov 15 2017 1:51AM | Last Updated: Nov 15 2017 1:41AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

गृहशांती पूजाविधीदरम्यान अपशकून झाल्याने पूजाविधी पूर्ण करा, नाहीतर वडिलांना मारून टाकू, अशी धमकी देऊन एका 22 वर्षीय तरुणीकडे वारंवार खंडणीची मागणी करणार्‍या ठाणे येथील भोंदूबाबाला नाशिकच्या पोलिसांनी अटक केली आहे. बाबाच्या सांगण्यावरून तसेच भीतीपोटी स्वत:च्या घरासह आईच्या मैत्रिणीच्या घरातही या तरुणीने तब्बल 19 लाखांची रोकड आणि 30 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचे समोर आले आहे. 

उदयराज रामआश्रम पांडे (रा. वांगणी अंबरनाथ, जि. ठाणे) असे या भोंदू तांत्रिक बाबाचे नाव आहे. त्यास सरकारवाडा पोलिसांनी कल्याण येथे खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडले. भोंदूबाबाच्या भीतीपोटी तरुणीने तिच्याच घरात चार लाख रुपये आणि 15 तोळे सोने, तर आईच्या मैत्रिणीच्या घरात 14 लाख रुपयांची रोकड आणि 15 तोळे सोने चोरले होते. 
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा पांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.