Sat, Jul 04, 2020 20:45होमपेज › Nashik › नाशिकरोड प्रेसचा नोटा छपाईचा विक्रम

नाशिकरोड प्रेसचा नोटा छपाईचा विक्रम

Last Updated: Nov 09 2019 2:04AM
नाशिकरोड : हरीश बोराडे
केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयाला शुक्रवारी (दि.8) तीन वर्षे पूर्ण झाली. जुने मशीन असतानाही नाशिकरोड प्रेसने त्यावेळी पाचशे दशलक्षांपेक्षा जास्त नोटा छापून विक्रम केला. शुक्रवारी तीन वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. 

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. त्याऐवजी पाचशे व दोन हजारांच्या नवीन नोटा आणल्या. देशाची गरज आणि उपलब्धता यामध्ये फरक असतानाही प्रेस कामगारांनी रात्रंदिवस काम केले. नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये अडीच हजार कामगार आहेत. दररोज सरासरी 18 ते 19 दशलक्ष नोटा छापल्या जातात. नोटांची छपाई देशात फक्‍त चार ठिकाणी होते. त्यामध्ये नाशिकरोड, देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोन (पश्‍चिम बंगाल) यांचा समावेश आहे. 

नाशिकरोड प्रेसमध्ये छापलेले चलन रेल्वे आणि रस्ता मार्गाने रिझर्व्ह बँकेच्या देशातील 18 वितरण केंद्रांत पाठवले जाते. नोटाबंदीमुळे झालेली समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने प्रेसमध्ये अविश्रांत नोट छपाईचे आदेश दिले. नोटांसाठी प्रथमच विमानांचा वापर करण्यात आला. प्रेसच्या नोटा ओझर विमानतळावरून विशेष विमानाने जम्मू, त्रिवेंद्रम, भुवनेश्‍वर, कोलकाता आदी भागांत पाठविण्यात आल्या. विमानाच्या अशा 30 ते 40 फेर्‍या पाठविण्यात आल्या होत्या. नाशिकरोड आणि देवास प्रेसने मिळून 27 डिसेंबर 2017 ला एकाच दिवसात एकूण  37.5 दशलक्ष नोटांची छपाई करून विक्रम केला. त्यामध्ये नाशिकरोडचा वाटा 20.5 दशलक्ष तर देवासचा वाटा 17 दशलक्षचा होता. 37.5 दशलक्ष नोटांमध्ये पाचशेच्या  26.5 दशलक्ष नोटांचा समावेश होता. उर्वरित नोटा 20, 50 आणि100च्या होत्या. प्रेसमधील जुन्या मशीन्सनी नोटाबंदी काळात क्षमता सिद्ध केली आहे.

या मशीनरी 30 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांचे आधुनिकीकरण व्हावे, आणखी मशीनरी मिळाव्यात या मागणीसाठी खासदार हेमंत गोडसे, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस देवीदास गोडसे, ज्ञानेश्‍वर जुंद्रे यांनी नवी दिल्लीत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती. नोटाबंदीत पाचशेच्या नवीन नोटा छपाईचे आव्हान प्रेस कामगारांनी सहज पेलले. कामगारनेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्‍वर जुंद्रे, राजेश टाकेकर, शिवाजी कदम, रमेश खुळे, संदीप व्यवहारे, योगेश कुलवधे, नंदू कदम आदी नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामगारांनी दोन वर्षे सुटी न घेता काम केले. यामुळेच नोटाटंचाई दूर झाली.

नाशिकरोड प्रेसमध्ये सध्या जुन्या मशीनच्या सहाय्याने वर्षाला सहा हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात. 10, 20, 50, 100, 200 आणि 500 च्या नोटांच्या त्यात समावेश आहे. एका मशीन लाइनमध्ये इनेटेग्लो, सायमल्टन, नंबरिंग आणि फिनिशिंग अशा चार मशीन असतात. त्यामुळे छपाई वेगात होते. 

चलनी नोटांचा वापर करा
ऑनलाइन व्यवहाराला महत्त्व आले असले, तरी सायबर क्राइमही वाढले आहे. चलनी नोटांच्या सहाय्यानेच सुरक्षित व्यवहार होतात. जपानमध्ये नोटांचेच प्रमाण जास्त आहे. त्यामुळे चलनाचा वापर करावा, असे आवाहन प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी केले आहे.