Fri, Sep 20, 2019 21:27होमपेज › Nashik › महात्मा आणि नाशिक

महात्मा आणि नाशिक

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 12:50AMसंपादन, लेखन : सुदीप गुजराथी

निव्वळ नैतिकतेच्या बळावर ब्रिटिशांशी यशस्वी अहिंसक लढा देणार्‍या, देशाच्या स्वातंत्र्योत्सवाकडे पाठ फिरवून जिवाच्या आकांताने दंगली विझवत फिरणार्‍या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निर्घृण हत्येला आज (दि. 30 जानेवारी) 70 वर्षे पूर्ण झाली. नाशिक येथे गांधीजी दोन वेळा येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. त्यांच्या स्मृतींच्या अनेक खुणा आजही शहरात जागोजागी दिसून येतात. त्या पुन्हा धुंडाळण्याचा हा प्रयत्न...  

महात्मा गांधींनी 1891 मध्ये केले होते रामकुंडात स्नान 

अवघ्या जगाला अहिंसा व करुणेचा संदेश देणार्‍या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाही एकेकाळी जातपंचायतीचा जाच सहन करावा लागला आणि आपल्या तथाकथित चुकीचे प्रायश्‍चित्त घेण्यासाठी त्यांना नाशिकच्या गोदाघाटावरील रामकुंडात स्नान करावे लागल्याची बाब समोर आली आहे. ‘महात्मा गांधी’ या नावाने ख्यातकीर्त होण्यापूर्वी सन 1891 मध्ये ते खास गोदावरीत स्नान करण्यासाठी नाशिकला आल्याचा उल्लेख आहे.  

महात्मा गांधी हे जन्माने हिंदू वैष्णव पंथाचे व मोढ बनिया जमातीचे होते. सन 1888 मध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कर्ज काढून इंग्लंडला जाण्याचे ठरवले; मात्र जमातीच्या कोणत्याही व्यक्‍तीने अद्याप समुद्र ओलांडलेला नसून, तसे करणे धर्माविरुद्ध असल्याने गांधींनीही परदेशी जाऊ नये, असा आदेश त्यांच्या मोढ बनिया जमातीच्या मुंबईतील नेत्यांनी दिला. गांधींनी तो जुमानला नाही. ‘ज्यांची तुम्हाला भीती वाटते, त्या मद्यपान, मांसाहार, परस्त्रीगमनासारख्या वाईट गोष्टी परदेशात करणार नसल्याचे वचन आपण आपल्या मातेला दिले आहे. त्यामुळे आपल्याला परदेशी जाऊ द्यावे’, असे गांधींनी सांगितले. मात्र, जमातीच्या प्रमुखांनी ते ऐकले नाही. अखेर त्यांचा विरोध डावलून गांधी हे 4 सप्टेंबर 1888 रोजी मुंबई येथून इंग्लंडला रवाना झाले. त्यामुळे जमातीच्या संतापलेल्या नेत्यांनी गांधी कुटुंबाला बहिष्कृत केले. समाजातील कोणत्याही व्यक्‍तीने या कुटुंबाला भेटू नये, मदत करू नये, असे फर्मान काढण्यात आले. याच काळात गांधींच्या मातोश्री पुतळीबाई यांचे निधन झाल्यावर त्यांच्या अंत्यसंस्कारालाही समाजाच्या व्यक्‍ती उपस्थित राहिल्या नाहीत. 

बॅरिस्टरची पदवी घेऊन 1891 च्या ऑगस्ट महिन्यात गांधी पुन्हा भारतात परतले. जमातीने आपल्या कुटुंबावरचा बहिष्कार मागे घ्यावा, अशी आईची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी गांधींनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांना नाशिकला जाऊन गोदावरीत स्नान करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार वयाच्या 22व्या वर्षी सन 1891 मध्ये गांधी मुंबईहून खास नाशिकला आले. त्यांनी गोदावरीत स्नान केले व येथून ते राजकोटला रवाना झाले. तेेथे जमातीतील ज्येष्ठ मंडळींसाठी भोजन समारंभ आयोजित करण्यात आला. प्रायश्‍चित्ताचा एक भाग म्हणून कंबरेच्या वर काहीही परिधान न करता उघड्या अंगाने गांधींना खाद्यपदार्थ वाढण्यास सांगण्यात आले. त्यानंतरच गांधी कुटुंबावरील बहिष्कार मागे घेण्यात आला. गांधींवरील एका पुस्तकात या घटनेचा उल्लेख आढळतो. दरम्यान, पुढे गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याबरोबरच जाती-पातीच्या भिंती तोडण्यासाठी संघर्ष केला, त्याची बीजे बहुधा या प्रसंगातून रुजली असावीत, असा कयास लावता येतो.

वसंत व्याख्यानमालेत झाले होते भाषण...

1891 नंतर सुमारे 40 वर्षांनी महात्मा गांधी हे 1932-33 मध्ये नाशिकच्या गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर वसंत व्याख्यानमालेत भाषण देण्यासाठी आले होते, असे सांगितले जाते. त्या काळी डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य हे वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष होते. त्यांनी गांधीजींना आमंत्रित केले होते. तेव्हा पगडबंद लेनमधील मोठ्या वाड्यातील संघवी कुटुंबाकडे ते उतरले होते, अशी माहिती मिळते; मात्र गांधी नेमके कोणत्या वर्षी नाशिकला आले होते, याविषयी मत-मतांतरे आहेत. वसंत व्याख्यानमाला सन 1922 मध्ये सुरू झाली. गेल्या वर्षी या व्याख्यानमालेचे 95 वे पुष्प गुंफले गेले. मात्र, गांधींचे नक्‍की भाषण कधी झाले, याविषयी वसंत व्याख्यानमालेकडे नोंद उपलब्ध नाही. काही जुन्या मंडळींच्या मते, गांधी हे सन 1924 मध्ये नाशिकला आले होते, तर त्यांनी सन 1932-33 मध्ये गोदाघाटावर भाषण दिल्याचे काहींचे म्हणणे आहे. गांधीजींनी व्याख्यान दिल्याचा उल्लेख काही पुस्तकांत आढळतो. त्यामुळे ते वसंत व्याख्यानमालेत आले होते, हे नक्‍की; मात्र त्याविषयीची नोंद नसल्याने ही मोठी घटना दुर्दैवाने कालौघात विस्मरणात गेली आहे. 


‘तो’ प्रसंग आठवल्यावर अजूनही थरकाप उडतो!

माझे वडील श्रीधर थत्ते व आई मालती थत्ते दोंडाईचा येथे राहत असत. सन 1924 पासून ते गांधीविचारांनी प्रभावित झाले. जमनालाल बजाज यांच्या आग्रहावरून गांधीजी वर्ध्याजवळ सेवाग्राम येथे आश्रम उभारणार असल्याचे कळताच वडिलांनी विनोबा भावे यांना पत्र पाठवले अन् या आश्रमात शिक्षक म्हणून काम करण्याची आपली इच्छा असल्याचे सांगितले. त्यावर विनोबांनी आई-बाबांना वर्ध्याला बोलावून घेतले. तेव्हा सन 1926 मध्ये तान्ह्या असलेल्या माझ्या मोठ्या भावासह आई-बाबा वर्ध्याला मुलींसाठी शिक्षणाची सोय असलेल्या महिलाश्रमात राहायला गेले. वडील महिलाश्रमाचे प्राचार्य, तर आई शिक्षिका होती. पुढे 1937 मध्ये माझा जन्म झाला.

अगदी बालवयातच आम्ही मुली सेवाग्राम आश्रमात काही विशेष कार्यक्रम असल्यास पायी जात असू. वर्ध्यापासून साधारणत: तीन-चार किमीवर सेवाग्राम आश्रम आहे. तिथे गेल्यावर बापूंचे दर्शन घडे. आमच्यासाठी ते आजोबाच होते. सुरुवातीला बापूंचे नुसते पंचावर राहणे मला खटकत असे. ‘हे आपल्या वडिलांसारखे शर्ट-पायजमा का घालत नाहीत’, असा प्रश्‍न पडायचा; पण पुढे त्यांचे विचार समजले. मला सर्वाधिक भावत असे ते बापूंचे निरागस हास्य. ते अगदी लहान मुलासारखे खळखळून हसत. त्यांच्यापर्यंत कोणीही सहज पोहोचू शकत असे. आश्रमात सर्वत्र त्यांचे बारकाईने लक्ष असे. एकदा आम्ही मुली डबे घेऊन सेवाग्राममध्ये आलो होतो. प्रत्येकीने आपला डबा फडक्यात गुंडाळून आणला होता. दुपारी सर्वांनी डबे सोडले, तेव्हा बापू सहज तिथे डोकावले. सगळ्या मुलींची निरनिराळ्या आकारांची, रंगांची फडकी पाहून त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, ‘ही अशी प्रत्येकाची वेगवेगळी फडकी बरी दिसत नाहीत. पुढच्या वेळी सर्वांनी स्वच्छ पांढर्‍या रंगाच्या, छान चौकोनी शिवलेल्या कापडात डबे

आणा... दिसायला ते बरे दिसते...’ 

- बापूंचे प्रत्येक गोष्टीवर किती बारकाईने लक्ष असे आणि त्यांची सौंदर्यदृष्टी कशी होती, याचा प्रत्यय आम्हाला त्या घटनेतून येऊन गेला. आश्रमात कोणीही सदस्य आजारी असल्यास बापू स्वत: त्याच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी जात. एवढेच नव्हे, तर रुग्णावर निसर्गोपचारही करीत. 1946 मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याच्या हालचालींना वेग आला. फाळणीचे रक्‍तरंजित परिणाम दिसू लागले, तेव्हा उसळलेल्या दंगली विझवण्यासाठी बापू सेवाग्राम आश्रमातून नौखालीला गेले. त्यांना निरोप देताना आम्हा सर्वांचे डोळे पाणावले होते. पुढे ते दिल्ली, पंजाब, कोलकाता असे ठिकठिकाणी दंगली विझवण्यासाठी फिरत राहिले. मधल्या काळात स्वातंत्र्यही मिळाले; पण बापू सेवाग्रामला आले नव्हते. अखेर 1 फेब्रुवारी 1948 रोजी ते वर्ध्याला येणार अशी वार्ता आली. आम्ही सारेच आनंदलो. जवळपास दोन-अडीच वर्षांनी बापू  येणार होते. आम्ही मुली मुख्य रस्त्यावर जाऊन त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणार होतो. सेवाग्राम आश्रमाच्या सजावटीचे काम जोरात सुरू होते. 

30 जानेवारी 1948. सायंकाळी आम्ही ‘गार्ड ऑफ ऑनर’च्या सरावावरून परतलो होतो. तोच घनश्याम नावाचा मुलगा सायकलवरून ‘महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या’ असे सायकलवरून ओरडत गेला. आईने त्याला आडवे जात नेमके काय घडले ते विचारले अन् गांधीजींचे निधन झाल्याचे ऐकताच तिच्या तोंडून शब्दच फुटेना. माझ्या बहिणीने धावत जाऊन वडिलांना ही बातमी दिली. आम्ही सारे रेडिओ असलेल्या खोलीत जमलो. त्यावर शोकधून सुरू होती व थोड्या-थोड्या वेळाने बापूंच्या हत्येचे वृत्त सांगितले जात होते. स्वागताचा माहोल सुतकात बदलला होता. 
त्या सायंकाळीही सेवाग्राममध्ये प्रार्थना झाली. त्या धक्क्यातून सावरण्यास आम्हाला बरेच दिवस लागले. आजही त्या प्रसंगाचे स्मरण झाल्यास अंगाचा थरकाप उडतो. 

स्वत:च्या हाताने बनवितात खादी

महात्मा गांधींनी खादीच्या माध्यमातून दिलेला स्वावलंबनाचा मंत्र शहरातील काही गांधीप्रेमी अद्यापही जपत असून, स्वत:च्या हाताने चरख्यावर सूतकताई करून त्या खादीच्या कापडाची वस्त्रे परिधान करण्याचा वसा सांभाळत आहेत. 

खादीचे कापड नुसते वापरायचेच नाही, तर ते स्वत:च्या हाताने तयार करायचे, या विचारातून शहरात हा उपक्रम सुरू झाला. त्याला ‘कताई मंडळ’ असे संबोधले जाते. या मंडळातील व्यक्‍ती रोज एक तास अंबर चरख्यावर सूतकताई करीत पर्यावरण रक्षणासह स्वावलंबनाचा मंत्रही जपत आहेत. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरीब भारतीयांचा स्वाभिमान जागा करीत त्यांना चरख्यावर सूतकताईचा कर्मयोग सांगितला. त्यामुळे परदेशी कापडाची मागणी घटलीच; शिवाय देशातील हजारो हातांना काम मिळाले, स्वावलंबनाचा मंत्र मिळाला. गांधीजींचा हा विचार देशातील हजारो गांधीवादी आचरणात आणतात.

नाशिकमध्ये सन 2008 मध्ये सर्वोदयी कार्यकर्त्यांनी ‘जीवन उत्सव’ या पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयीच्या उपक्रमाला सुरुवात केली. त्यावेळी अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन सूतकताईविषयी चर्चा झाली. त्यातूनच ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या वासंती सोर यांना कताई मंडळ स्थापन करण्याची कल्पना सुचली. सोर या पूर्वीपासून अंबर चरखा कताईचे प्रशिक्षण देतच होत्या. अशा प्रशिक्षित मंडळींनी स्वत: चरखा विकत घेऊन घरात कापसाच्या पेळूपासून रोज किमान एक तास सूतकताई करावी, त्यातून तयार झालेले सूत वर्ध्याच्या ग्रामसेवा मंडळाकडे देऊन त्या बदल्यात खादीचे कापड आणावे आणि त्यातून स्वत:साठी वस्त्रे शिवावीत, अशी मंडळाची कल्पना होती. त्यानुसार शहरातील गांधीवादी रोज सूतकताई करतात. त्यात वासंती सोर यांच्यासह मुकुंद दीक्षित, दिलीप धुळेकर, अजित टक्के, गौतम भटेवरा आदींचा समावेश आहे. 

महात्मा गांधी रोड : सन 1948 चे स्मरण

सध्या नाशिकमधील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ता म्हणून गणला जाणारा महात्मा गांधी रोड हा सन 1948 ते 1952 या काळात पक्‍का बांधण्यात आल्याची नोंद आहे. सिमेंटमध्ये तयार केलेल्या एक हजार 500 फुटांच्या या रस्त्यासाठी त्या काळी 56 हजार 473 रुपये 14 आणे खर्च आल्याची नोंद कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर संपादित ‘जीवनगंगा’ या पुस्तकात आढळते. त्यापूर्वी तेथे कच्चा रस्ता होता व त्याला ‘हत्तीखाना रोड’ असे म्हटले जात असे. या भागात वकिलांची मोठ्या प्रमाणात घरे होती. त्यामुळे या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका भागाला आजही ‘वकीलवाडी’ म्हणून संबोधले जाते. महात्मा गांधी रोडवर त्या काळी फारशी वाहतूक व दुकानेही नव्हती. हा संपूर्णत: रहिवासी भाग होता.

हळूहळू त्याचे रूपांतर बाजारपेठेत होत गेले. नाशिकमधील क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी नाशिक जिल्ह्याचे 22वे कलेक्टर एम. टी. जॅक्सन यांची विजयानंद चित्रपटगृहात हत्या केली होती. कान्हेरे यांचे निकटचे सहकारी गो. ग. धारप हे तेव्हा वकीलवाडीत राहत असत. जॅक्सन खुनाच्या कटाबद्दल त्यांनी पाच वर्षांची शिक्षाही भोगली होती. त्यामुळे वकीलवाडीतील रस्त्याचे नामकरण ‘हुतात्मा अनंत कान्हेरे पथ’ असे करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने ते फारसे प्रचलित होऊ शकले नाही. त्या काळी तुरळक वर्दळ असलेल्या महात्मा गांधी रोड व वकीलवाडी भागात टुमदार बंगले होते. जाई-जुईसह फुलझाडे, फळझाडांनी हा परिसर व्यापलेला होता. या रस्त्यावर सध्याच्या सारडा संकुलाच्या जागी एका बंगलावजा घरामध्ये जिल्हा प्रसिद्धी अधिकार्‍यांचे कार्यालय होते. आता हे कार्यालय याच संकुलात तिसर्‍या मजल्यावर आहे. सन 1948 नंतर हा रस्ता पक्‍का बांधण्यात आला. तेव्हा नुकतेच महात्मा गांधीजींचे निधन झाले होते. त्यामुळे या रस्त्याचे हत्तीखाना रोड हे नाव बदलून ते महात्मा गांधी रोड असे करण्यात आले. दुर्दैवाने आता त्याचेही संक्षिप्‍तीकरण होऊन हा रस्ता हा ‘एम. जी. रोड’ नावाने ओळखला जातो.

गोवर्धन येथील निर्मल ग्राम निर्माण केंद्र

दिवंगत ज्येष्ठ गांधीवादी भाऊ नावरेकर यांनी गांधीविचारांनी प्रभावित होऊन सन 1983 मध्ये नाशिकच्या गंगापूरजवळच्या गोवर्धन येथे निर्मल ग्राम निर्माण केंद्राची स्थापना केली. ‘सफाई में ही खुदाई हैं’ असे गांधीजी स्वच्छतेसंदर्भात म्हणत. त्यांचा हा विचार पुढे नेताना स्वच्छतेसंदर्भात लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, साफसफाई हा प्रत्येकाच्या व्यक्‍तित्त्वाचा व समाजजीवनाचा भाग बनविणे, स्वच्छतेची सोपी व स्वस्त तंत्रे विकसित करणे, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, पर्यावरणपूक जीवनशैलीचा जागर आदी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या केंद्राची स्थापना करण्यात आली. शून्य कचरा घरे, कमी पाणी लागणारी व स्वस्त शौचालये आदी अनेक मॉडेल्स या केंद्राने विकसित केली आहेत. केंद्रातर्फे यासंदर्भात प्रशिक्षण, तांत्रिक मदत दिली जाते. तसेच पुस्तकेही प्रकाशित करण्यात आली आहेत. केंद्राच्या अध्यक्षा नलिनी नावरेकर, श्रीकांत नावरेकर हे सध्या या केंद्राचे काम पाहतात. गांधीजींनी दिलेल्या स्वच्छतेच्या मंत्राचे अनुसरण करीत निष्ठेने मूलभूत काम उभे करणारे हे केंद्र पर्यावरणासंदर्भात मोलाची भूमिका बजावत आहे. 

गांधी टोपी व चष्म्याचा विश्‍वविक्रम

नाशिकमधील काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते वसंत ठाकूर यांनी गांधी विचारांचा प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी 2 ऑक्टोबर 2014 रोजी जगातील सर्वांत मोठी गांधी टोपी, तर 2016 मध्ये गांधीजींच्या चष्म्याची महाकाय प्रतिकृती साकारत विश्‍वविक्रम केला होता. गांधी टोपी 3 बाय 50 फूट आकाराची होती. ती बनविण्यासाठी 108 मीटर कापड वापरण्यात आले. दोन कारागिरांनी दोन दिवस खपून ही टोपी तयार केली होती. गिनीज बुक व लिम्का बुकमध्ये या विक्रमाची नोंद झाली होती. गांधीजींच्या चष्म्याची प्रतिकृती 60 बाय 9 फुटांची होती. या विक्रमाचीही इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. विशेष म्हणजे, या उपक्रमांबद्दल ठाकूर यांना काही दिवसांपूर्वीच अज्ञात व्यक्‍तीद्वारे धमकी देण्यात आली व ते करीत असलेल्या गांधीविचारांच्या प्रचाराबद्दल नाराजी व्यक्‍त करण्यात आली.  
हजारोंच्या उपस्थितीत रामकुंडात अस्थिविसर्जन

जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे महात्मा गांधीजींचा खून झाला. त्यांच्या अस्थींचे विसर्जन नाशिक येथील रामकुंडात करण्यात आले. साधारणत: 9 किंवा 10 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम झाला. तत्कालीन बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या