Sat, Jul 11, 2020 12:35होमपेज › Nashik › आमदार पुत्राचे खा. चव्हाण यांना माकपात निमंत्रण

आमदार पुत्राचे खा. चव्हाण यांना माकपात निमंत्रण

Published On: Mar 30 2019 1:31AM | Last Updated: Mar 29 2019 10:58PM
नाशिक: प्रतिनिधी

लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी डावललेल्या खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या समर्थकांनी शुक्रवारी (दि.29) सुरगाणा येथे घेतलेल्या मेळाव्यात आमदार जिवा पांडू गावित यांचे पुत्र इंद्रजित यांनी चव्हाण यांना माकपात येण्याचे निमंत्रण दिले. मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करणारे चव्हाण उर्वरित तालुक्यातील समर्थकांशी येत्या दोन दिवसात चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार आहेत.
चव्हाण यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. पण, यावेळी त्यांना डावलून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रवेशकर्त्या झालेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपाने उमदेवारी दिल्याने चव्हाण कमालीचे नाराज झाले होते. दरम्यानच्या काळात या मतदारसंघातील भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. चव्हाण नेमकी काय भूमिका घेणार याकडे अख्ख्या मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी सुरगाणा येथे समर्थकांचा मेळावा झाला असून, त्यास प्रतिसाद लाभल्याचा दावा करण्यात आला आहे.चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, असा यावेळी समर्थकांचा सूर होता.

कळवण, सुरगाणा आणि पेठ येथील समर्थक उपस्थित होते. या मेळाव्यास आमदार गावित यांचे पुत्र इंद्रजित यांनीही हजेरी लावत चव्हाण यांना माकपात येण्याचे आवताण दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण आमदार गावित स्वत: उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. हेच गावित आणि चव्हाण एकत्र आल्यास या मतदारसंघातील समीकरणे बदलू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तसेही चव्हाण यांचे तिकीट ज्यांच्यामुळे कापले गेले, त्या पवार यांच्यावर चव्हाण समर्थकांचा कमालीचा रोष असून ‘आता पाडायचं’, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत चव्हाण यांना माकपात प्रवेश देऊन उमेदवारी दिली गेल्यास पुढे काय, अशी भीती विरोधी उमेदवारांमध्ये आहे. 

मतदारसंघातील उर्वरित तालुक्यांमधील समर्थकांशी चव्हाण येत्या दोन -तीन दिवसात संवाद साधणार असून, त्यांची मतं जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.