Mon, Sep 16, 2019 11:34होमपेज › Nashik › लोकसभा निवडणूक; नव्या तंत्रज्ञानाचा वापर

लोकसभा निवडणूक; नव्या तंत्रज्ञानाचा वापर

Published On: Feb 27 2019 1:15AM | Last Updated: Feb 27 2019 1:15AM
नाशिक : प्रतिनिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट आणि सी-विजीलसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विभागप्रमुखांनी आवश्यक पूर्वतयारी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.26) आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर उपस्थित होते.

नीलेश सागर म्हणाले, सि-विजील या माध्यमातून येणार्‍या तक्रारीबाबत तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी नागरिकांत विश्‍वास निर्माण व्हावा यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग करण्यात येणार आहे. विभागप्रमुखांनी कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापन करून कर्मचार्‍यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत निवडणूक प्रक्रियेची माहिती पोहोचवावी, असे आवाहन सागर यांनी केले. विभागप्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व कर्मचार्‍यांची माहिती पाठवावी. निवडणुकीसंदर्भातील आपली जबाबदारी पार पाडत प्रत्येकाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत सहकार्य करावे, असेही सागर म्हणाले.

अरुण आनंदकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनात प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांची माहिती संकलित करून ती तातडीने सादर करावी. मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर विद्युत व्यवस्थेबाबत महावितरणने आढावा घ्यावा, पोलीस विभागाने सुरक्षा आराखडा तयार करावा, जिल्हा परिषद आणि महापालिकेने मतदार जागृती कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे त्यांनी सांगितले. निवडणूक विषयक सर्व पत्रव्यवहार पेपरलेस होईल, असेही आनंदकर यांनी सांगितले. बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना प्रशिक्षण

नाशिक मध्य व नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील केंद्रनिहाय अधिकार्‍यांचे प्रशिक्षण शिबिर भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडले. लोकसभा निवडणुकीचे  हे पहिलेच प्रशिक्षण असून, अधिकार्‍यांना निवडणुकीची सविस्तर माहिती देण्यासह ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स्चे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अधिकार्‍यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.