Sat, Sep 21, 2019 06:37होमपेज › Nashik › संभाजीराजेंचा शौर्यपट उलगडला

संभाजीराजेंचा शौर्यपट उलगडला

Published On: Jan 21 2019 1:35AM | Last Updated: Jan 20 2019 11:20PM
नाशिक : प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांनंतर संभाजी महाराजांनी लढलेल्या लढाया, औरंगजेब, शहाबुद्दीन खान यांसारख्यांवर केलेली आक्रमणे व एकूणच संभाजी महाराजांचा शौर्यपट प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. सचिन कानिटकर यांनी उलगडला. 

‘संस्कृती नाशिक’ संस्थेतर्फे आयोजित ‘धगधगते शंभुपर्व’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तीनदिवसीय व्याख्यानमालेचा समारोप रविवारी (दि. 20) झाला. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या कार्यक्रमात प्रा. कानिटकर यांनी इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर प्रकाशझोत टाकला. यावेळी तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे, महापौर रंजना भानसी, आमदार हेमंत टकले, अ‍ॅड. विलास लोणारी, माजी महापौर अशोक दिवे, राहुल दिवे, अर्जुन टिळे, उल्हास सातभाई, शरद आहेर, श्रीकांत बेणी, शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते. प्रा. कानिटकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकत संभाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या व जिंकल्या. 18 जून 1680 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी अनेक गड-किल्ले जिंकले. यावेळी प्रा. कानिटकर यांनी औरंगजेबाविरुद्धच्या लढाईचे अंगावर रोमांच आणणारे वर्णन केले. संभाजी महाराजांचा खरा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

‘संस्कृती नाशिक’चे अध्यक्ष शाहू खैरे व भारती खैरे यांच्या हस्ते डॉ. शीतल मालुसरे यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास नव्या पिढीला सांगण्याची गरज आहे. आपण अनेकदा इतिहास घडविण्याविषयी प्रेरणा देत असतो. परंतु, आधी हा तेजस्वी इतिहास मुलांपर्यंत पोहोचवायला हवा, असे मत यावेळी डॉ. शीतल मालुसरे यांनी व्यक्‍त केले.