Mon, Sep 16, 2019 05:52होमपेज › Nashik › जाधव खून प्रकरणी सात जणांना जन्मठेप

जाधव खून प्रकरणी सात जणांना जन्मठेप

Published On: May 09 2019 1:51AM | Last Updated: May 08 2019 11:34PM
नाशिक : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून राहुल ऊर्फ गुणाजी गणपत जाधव याचा खून आणि इतरांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 58 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

15 सप्टेंबर 2015 रोजी मध्यरात्री सीबीएस येथील तुळजा रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बारमध्ये गुणाजी जाधव याचा खून झाला होता. संशयित आरोपी निखिल ऊर्फ बाळ्या मनोहर मोरे (26, रा. बोरगड) आणि किशोर नागरे यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे सर्व आरोपींनी कट रचून याचा वचपा काढण्याचा बेत आखला. त्यानुसार संशयित जॉन रेवर याने किशोर आणि राहुल यांची माहिती काढून दोघेही तुळजा हॉटेलमध्ये बसल्याची माहिती इतर आरोपींना दिली. त्यानंतर इतर आरोपींनी चॉपर, चाकू, तलवार, गावठी कट्टा असे हत्यार गोळा करून हॉटेल तुळजा येथे जमले. हॉटेलमध्ये आरोपींनी किशोर नागरे, विकी दिवे, सागर परदेशी यांच्यासह राहुल जाधव याच्यावर शस्त्रांनी वार केले. वर्मी घाव बसल्याने राहुल ऊर्फ गुणाजी जाधव याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, पुरावे नष्ट करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर.व्ही. शेगर व पोलीस नाईक रवींद्रकुमार पानसरे यांनी केला. त्यांनी पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे आर.एल. निकम यांनी युक्तिवाद केला. न्यायालयात साक्षीदार, पंच, मोबाइल रेकॉर्ड आणि पोलिसांच्या तपासाच्या आधारे न्यायालयाने 11 पैकी 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी 58 हजार याप्रमाणे तीन लाख 73 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी निखिल मोरे याचाही नंतर खून झाला होता. तर उर्वरित तिघांची पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष सुटका केली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई आर. आर. जाधव यांनी कामकाज पाहिले. 

आरोपी-साक्षीदाराचाही खून : गुणाजी जाधव खून प्रकरणात मुख्य संशयित आरोपी म्हणून निखिल मोरे याचे नाव होते. गुणाजी जाधव खून प्रकरणानंतर ऑगस्ट 2017 मध्ये निखिल मोरे याचा गोळी झाडून आणि धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर जुलै 2018 मध्ये गुणाजी जाधव खून प्रकरणातील साक्षीदार किशोर नागरे याचा रामवाडी परिसरात खून करण्यात आला होता. हा खूनदेखील जाधव खून प्रकरणातील आरोपींनी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

आरोपींची नावे : समीर दत्तात्रय व्यवहारे व अमित दत्तात्रय व्यवहारे (26, रा. आदर्शनगर, रामवाडी), सुनील हंसराज सेनभक्त (26, रा. स्नेहनगर, म्हसरूळ), अंकुश राजेंद्र मगर (24, रा. क्रांतीनगर, रामवाडी), व्यंकटेश नानासाहेब मोरे (27, रा. कामटवाडा, सिडको), (रा. आदर्शनगर, रामवाडी), सुशील मनोहर गायकवाड (21, रा. मखमलाबाद नाका), अ‍ॅण्डी ऊर्फ दीपक वाघमारे (27, रा. पंचवटी) अशी या आरोपींची नावे आहेत. तर हर्षद ऊर्फ हिरंभ पोपट निकम (22, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको), संजय रमेश बोरसे ऊर्फ कामड्या (35, रा. अशोकस्तंभ)  आणि जॉन ऊर्फ विराज ऊर्फ अनिल देवीदास रेवर (रा. पंचवटी) यांची पुराव्यांअभावी सुटका केली.