होमपेज › Nashik › दुष्काळामुळे शेकडो कुटुंबे स्थलांतरित

दुष्काळामुळे शेकडो कुटुंबे स्थलांतरित

Published On: May 15 2019 1:56AM | Last Updated: May 15 2019 12:42AM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात दुष्काळाने अक्षरश: टोक गाठले असून, त्याचा फटका हजारो नागरिकांना बसतो आहे. दुष्काळामुळे त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूल या आदिवासी भागांतील शेकडो कुटुंबे नाशिकमध्ये स्थलांतरित झाली असून, त्यांचे संसार अक्षरश: उघड्यावर आले आहेत. पेठ रोड व त्र्यंबक रोड परिसरात ही कुटुंबे रस्त्यावर राहत असून, येथेही त्यांचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत. पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे या कुटुंबांची कच्चीबच्ची रस्त्यावर आल्याचे भीषण चित्र आहे. 

राज्यासह जिल्ह्यात तीव्र दुष्काळाची स्थिती असून, धरणे, विहिरींसह ठिकठिकाणचे जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे साधे पिण्यासाठीही पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात अद्याप 80 दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक असल्याने शहरवासीयांना दुष्काळाची झळ बसलेली नाही. मात्र, ग्रामीण भागांत हादरून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक आदिवासी तालुक्यांत ग्रामस्थांना पाण्यासाठी पाच ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. विहिरींमध्ये उतरून मिळेल ते गढूळ पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये असलेली पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूलमधील शेकडो कुटुंबांनी शहराची वाट धरली आहे. त्यांनी पेठ रोड व त्र्यंबक रोडच्या कडेलाच आपले संसार थाटले असून, तेथेच चुली पेटवून स्वयंपाक केला जात आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी उघड्यावर डेरा टाकायचा, तेथे दगडाची चूल मांडायची, त्यावर स्वयंपाक करायचा व हाताला मिळेल ते काम करायचे असा या माणसांचा सध्याचा दिनक्रम आहे. दुष्काळामुळे करावी लागणारी पाण्यासाठी वणवण, नसलेला रोजगार यामुळे उदरनिर्वाह करण्याच्या उद्देशाने ही शेकडो कुटुंबे नाशिकमध्ये स्थलांतरित झाली आहेत. असहाय व हतबल झालेल्या या कुटुंबांना मदतीची गरज आहे. मात्र, जमीन कोरडीठाक पडली असताना आणि शहरी माणसांमधील संवेदनशीलताही आटत चालली असताना, प्रशासन वा सामाजिक कार्यकर्त्यांच्या हृदयाला पाझर फुटून या कुटुंबांना काही मदत मिळेल का, याविषयी साशंकताच आहे.