Tue, Nov 19, 2019 11:25होमपेज › Nashik › त्र्यंबकेश्‍वरावर जलाभिषेक

त्र्यंबकेश्‍वरावर जलाभिषेक

Published On: Jul 12 2019 1:56AM | Last Updated: Jul 11 2019 11:07PM
त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहर-परिसरात पूरस्थती उद्भवली आहे. वरुणराजाकडून त्र्यंबकेश्‍वरावर जणू निरंतर जलाभिषेकच सुरू आहे, अशी भावना भाविकांसह रहिवाशांतून आहे. दर्शनार्थींचे हाल होत आहेत, हा भाग वेगळा!

आजतर स्थिती अधिकच तापदायक बनलेली होती. मेनरोड, तेली गल्ली, लक्ष्मीनारायण चौक, गंगासागर तलावाच्या बाजूस रस्त्यावर अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी वाहत होते. मेनरोड आणि तेली गल्ली परिसरातील घरा-दुकानांतही पाण्याने कब्जा केला. रस्त्यावर उभी वाहनेही पाण्यात तुडुंब झाली होती.  अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाले. गंगासागर तलाव ओसंडण्याच्या स्थितीत आला. प्लास्टिक कचर्‍याने जागोजागी पाणी तुंबले. शहरातील सखल भागांतील जवळपास सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी होते.  डोंगरावर चर खोदून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’मध्ये कामगिरी केल्याचा नगरपालिका प्रशासनाने केलेला दावा, या पावसाने फोल ठरवला आहे. गतवर्षी पाऊस कमी झाला म्हणून शहरात पूर आला नव्हता. तेव्हा चार्‍या आणि खड्डे खोदल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले गेले. मात्र, यावर्षी आठवड्यात दोन वेळा पूर आल्याने प्रशासनाचा तो दावा किती कुचका होता, हे सिद्ध झाले आहे. 

कचरा डेपो परिसरात नदीपात्रातील पाणी शिरले आणि कचर्‍यासह हे पाणी गोदावरीत आले. हेच पाणी शहरात पिण्यासाठी वापरले जाईल. साहजिकच आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे.

त्र्यंबकराजाच्या आवारात तलाव

त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. भाविकांना वाट काढणे कष्टाचे झाले आहे.