Mon, Sep 16, 2019 05:37होमपेज › Nashik › भरदिवसा पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत घरात घुसून दीड लाखांची लूट

भरदिवसा पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत घरात घुसून दीड लाखांची लूट

Published On: May 06 2019 1:50AM | Last Updated: May 05 2019 6:58PM
मालेगाव : वार्ताहर

शहरातील ताश्कंद नगर भागात रविवारी (दि.५) भर दिवसा अज्ञात तिघा चोरट्यांनी घरात घुसून आई व मुलाला पिस्तुल व चाकूचा धाक दाखवत दीड लाख रुपये लुटून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

ताश्कंद नगर येथे फातिमा हकीम (९०) व त्यांचा मुलगा अशरफ शब्बीर हकीम (६०) हे वास्तव्यास आहेत. हे दोघे दुपारी त्यांच्या घरात झोपलेले होते. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात तिघा भामट्यांनी घरात अनाधिकृतपणे प्रवेश करत धुडगूस घालत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी आई व मुलाने पैसे देण्यास विरोध करताच या तिघा चोरट्यांनी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण करत कपाटातील दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. या चोरट्यांच्या मारहाणीत आई व मुलगा जखमी झाले. चोरटे पळून गेल्यानतर हकीम यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनाम केला. जखमी हकीम आई व मुलाला रुग्णालयात दाखल केले असून अज्ञात चोरट्याविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.