Sun, Dec 08, 2019 16:45होमपेज › Nashik › नाशिक : गोदावरीचा पूर ओसरला; गंगापूरच्या विसर्गात घट

नाशिक : गोदावरीचा पूर ओसरला

Published On: Aug 12 2019 1:16PM | Last Updated: Aug 12 2019 1:16PM

संग्रहित छायाचित्रनाशिक : प्रतिनिधी

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गंगापूर धरणाच्या विसर्गात आज (ता.१२) ७५८ क्युसेकपर्यंत घट करण्यात आली. त्यामुळे गोदावरी नदीचा पूर ओसरला आहे. परिणामी गेल्या १० दिवसांपासून गोदावरी घाटावरील पाण्याखाली असलेले छोटे-मोठे पूल खुले झाले आहेत. पूर ओसरल्याने पंचवटीतील श्री कपालेश्वर, नारोशंकरसह इतर शिवमंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध धरणातून केल्या जाणार्‍या पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली. त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला. त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप घेतल्याने सोमवारी धरणाच्या विसर्गात लक्षणीय घट करण्यात आली. त्यामुळे गोदावरी नदीची पूरपरिस्थिती निवळली आहे. 

दरम्यान, पूरपरिस्थिती निवळली असली तरी गेल्या रविवारपासून गोदावरीच्या महापूराच्या खुणा अद्यापही काठावरील वस्त्या व बाजारांमध्ये दिसून येत आहे. भांडी व कापड बाजारात आजही गाळ उपसण्याचे काम सुरूच आहे. पुराच्या पाण्यामुळे मोडून पडलेला संसार उभा करण्यात नागरिक व्यग्र आहेत.

गोदावरी व दारणा समुहातील धरणांमधून केला जाणारा विसर्ग कमी करण्यात आल्याने निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वरचा विसर्गही घटविण्यात आला आहे. तर पहाटेपासून धरणातून १७ हजार७७८ क्युसेक विसर्ग जायकवाडीला केला जात आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरण ८६. ९८ टक्के भरले आहे. त्यामुळे पैठण जलविद्युत केंद्रातून सकाळी ९ वाजेपासून १५८९ क्युसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग केला जात आहे.