Tue, Nov 19, 2019 11:05होमपेज › Nashik › माजी खासदार पिंगळेंची ‘एसीबी’कडून चौकशी

माजी खासदार पिंगळेंची ‘एसीबी’कडून चौकशी

Published On: Jul 12 2019 1:56AM | Last Updated: Jul 11 2019 11:13PM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचार्‍यांच्या खात्यातून धनादेशाने पैसे काढून अपहार केल्याप्रकरणी मुख्य संशयित तसेच माजी खासदार देवीदास पिंगळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. शरणपूर रोडवरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गुरुवारी (दि.11) सुमारे दोन तास पिंगळेंवर प्रश्‍नांचा पाऊस पडला. 

ऑक्टोबर 2016 मध्ये पेठ रोडवरील जिल्हा बँकेच्या शाखेतून कृउबा  समितीचे लिपिक दिगंबर हिरामण चिखले, लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन आणि स्टेनो विजय सीताराम निकम या तिघांनी 57 लाख 73 हजार 800 रुपयांची रोकड काढली होती. एमएच 15 सीएम 2180 क्रमांकाच्या कारमधून ही रोकड घेऊन जात असताना लाचलुचपत विभागाने रोकडसह कार जप्त केली होत. या रकमेचा हिशेब न दिल्याने म्हसरूळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत माजी खासदार पिंगळे यांच्या विरोधात पुरावे आढळल्याने त्यांना अटक झाली होती. नंतर ते जामिनावर बाहेर आहेत. पिंगळे यांनी सांगितले की, 2009 मध्ये माझ्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याची तक्रार विभागाकडे होती. काही कागदपत्रे विभागास हवी असल्याने ती देण्यासाठी मी हजर झालो.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणी देवीदास पिंगळे यांची ही नियमित चौकशी होती. चौकशीसाठीच त्यांना बोलवण्यात आले होते. भविष्यात गरज भासल्यास पुन्हा बोलावले जाईल, असे लाचलूचपतचे पोलिस अधिक्षक सुनील कडासने यांनी सांगितले.